
वांद्रे पश्चिम बँडस्टँड येथील मन्नत बंगल्याजवळील जिवेश इमारतीच्या १४ मजल्यावर सोमवारी आगीचा भडका उडाला. या दुर्घटनेनंतर या इमारतीत आग प्रतिबंधक उपाय कागदावरच असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे इमारतमालक व रहिवाशांना नोटीस बजावण्यात येणार असल्याचे समजते.
रात्री उशिरापर्यंत १४ मजल्यावरील २१ लोकांची सुखरूप सुटका करण्यात आली असून, यामध्ये १० महिला व ११ पुरुषांचा समावेश आहे. तर मुंबई अग्निशमन दलाचे कुशल रजपूत यांना धुरामुळे त्रास झाल्याने वांद्रे येथील भाभा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वांद्रे बँडस्टँड मन्नत बंगल्याशेजारी जिवेश ही २१ मजली इमारत आहे. या इमारतीच्या १३ आणि १४ व्या मजल्यावर सोमवारी सायंकाळी ८ वाजता भीषण आग लागली. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने लेवल दोनची आग जाहीर करण्यात आली. ही आग घरातील इलेक्ट्रिक वायरिंगमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
दरम्यान, अग्निशमन दलाच्या जवानांना घटनेची माहिती मिळताच आठ फायर इंजिन, सात जम्बो टँकर, रुग्णवाहिकेसह घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि रात्री १० वाजता आगीवर नियंत्रण मिळवण्यात आल्याचे अग्निशमन दलातील अधिकाऱ्याने सांगितले.
कोणत्याही इमारतीमध्ये आग प्रतिबंधक यंत्रणा असणे गरजेचे आहे; परंतु जिवेश इमारतीत ही उपाययंत्रणा फक्त कागदावरच असल्याचे दिसून आले. त्यामुळे लवकरच इमारतीचे मालक आणि रहिवाशांनाही नोटीस बजावण्यात येईल.
- हेमंत परब, प्रमुख, मुंबई अग्निशमन दल