मुंबईतील वाहतुकीचा चेहरामोहरा बदलणाऱ्या मेट्रो उभारणीचे काम वेगाने सुरू आहे. दक्षिण मुंबईतील कुलाब्यापासून प. मुंबईतील अंधेरीपर्यंत भुयारी मार्गातील ‘मेट्रो-३’च्या पहिल्या टप्प्याचे काम ८८.२० टक्के कमी झाले आहे. आरे ते वांद्रे-कुर्ला संकुलाचे काम यंदाच्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे, तर बीकेसी ते कफ परेड दरम्यानचे काम ७७.३ टक्के पूर्ण झाले आहे. हे काम पूर्ण होऊन जून २०२४ पासून हा सर्व मेट्रो मार्ग सुरू होईल.
मुंबईतील वाहतुकीची समस्या सध्या जटिल बनली आहे. रेल्वेतून ८० लाख प्रवासी प्रवास करत आहेत. रेल्वेचा प्रवास जीवघेणा बनलेला आहे. या प्रवासातून मुक्ती मिळण्यासाठी मेट्रो रेल्वे यंत्रणा मुंबईत उभारण्यास सुरुवात झाली. शहरात तीन टप्पे सुरू झाले असून, त्याला प्रवाशांचा भरभरून प्रतिसाद मिळत आहे.
मुंबईची ‘मेट्रो-३’ ही पूर्णपणे भुयारी मेट्रो आहे. कुलाबा ते अंधेरी दरम्यान ती धावणार आहे. हा मार्ग ३३ किमीचा आहे. या मार्गात अनेक इमारती असल्याने ही मेट्रो भुयारी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
गेल्या ७ वर्षांपासून या मेट्रोचे काम सुरू आहे. आरे-बीकेसी हा पहिला टप्पा पहिल्यांदा सुरू करण्याचे नियोजन आहे. हे काम ८८ टक्के पूर्ण झाले. यातील ओव्हरहेडचे काम ५८.८० टक्के, सर्व यंत्रणांचे काम ६६.७० टक्के, स्टेशनची उभारणी ९३.४० टक्के, भुयारीतील स्टेशनची उर्वरित कामे ९७.८० टक्के, मेट्रो मार्ग बसवणे ८९.५० टक्के काम झाले.
या मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्यातील कामाचे बीकेसी ते कफ परेड या मार्गिकेचे ७७.३ टक्के काम पूर्ण झाले. ओव्हरहेडचे काम ४६.३० टक्के, सर्व यंत्रणांचे काम ४६.८० टक्के, स्टेशनची उभारणी ८८.७० टक्के, भुयारीतील स्टेशनची उर्वरित कामे ८८.७० टक्के, भुयारातील कामे ९५.५० टक्के, तर मुख्य मार्गातील कामे ४६.९० टक्के झाली आहेत.