पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार

पश्चिम रेल्वेवरील एसी लोकलच्या फेऱ्या वाढणार

उपनगरीय रेल्वे मार्गावरील एसी लोकलच्या तिकीटदरातील कपातीनंतर या लोकलमधील प्रवासीसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तुलनेने लोकल फेऱ्या संख्या कमी असल्याने प्रवाशांचा वाढता प्रतिसाद लक्षात घेत पश्चिम रेल्वेने वातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार या मार्गावर जवळपास २८ फेऱ्यांची भर पडण्याची शक्यता असून, सद्य:स्थितीत १२ फेऱ्यांचे नियोजन झाल्याची माहिती पश्चिम रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आली आहे.

५ मेपासून वातानुकूलित लोकलच्या तिकीटदरात ५० टक्के कपात करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला. यानंतर मध्य रेल्वेसह पश्चिम रेल्वेवरील वातानुकूलित लोकलच्या काही फेऱ्यांनाही प्रतिसाद वाढू लागला. पूर्वी प्रतिदिन एक ते अडीच हजार तिकिटांची विक्री होत असताना सध्या पाच हजारांहून अधिक तिकिटांची विक्री होत आहे. दरम्यान, एकीकडे वाढती उष्णता आणि दुसऱ्या बाजूला एसी लोकलमध्ये मिळालेली सवलत यामुळे दिवसागणिक एसी लोकलची प्रवासी संख्या वाढत आहे. हा प्रतिसाद पाहता लोकल फेऱ्यांमध्ये वाढ करणे अनिवार्य असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.

यामुळे पश्चिम रेल्वेवर एसी लोकल फेऱ्यांच्या संख्या वाढवण्यासाठी प्रशासन प्रयत्न करत असून लवकरच आणखी १२ फेऱ्यांची यामध्ये भर पडणार आहे. त्यानुसार चर्चगेट ते विरारदरम्यान पाच, अंधेरी ते विरार एक आणि विरार ते चर्चगेट पाच, तसेच भाईंदर ते चर्चगेट एक अशी वातानुकूलित लोकल फेऱ्यांमध्ये वाढ होणार आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in