तलाव भरले; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

सप्टेंबर २०२४ पर्यंत नो टेन्शन ; ३६१ दिवसांचा पाणीसाठा
तलाव भरले; मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली

मुंबई : मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रात पावसाची स्लो इनिंग सुरू असली तरी पुढील वर्षभराची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे. शनिवार, ९ सप्टेंबर रोजी सातही धरणात ९६.२० टक्के पाणी साठा उपलब्ध असून, ३६१ दिवस म्हणजे सप्टेंबर २०२४ पर्यंत मुंबईकरांची तहान भागवेल इतका आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात धरणांपैकी ५० टक्के पाणी पुरवठा भातसा धरणांतून होत असून, ९७.५ टक्के पाणी साठा उपलब्ध असल्याने मुंबईकरांना पिण्याच्या पाण्याचे नो टेन्शन.

मोडक सागर, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा, भातसा, तानसा, विहार व तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज ३,९०० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सात धरणात १४ लाख ४७ हजार ३४३ दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असणे गरजेचे असते. ३० जून रोजी सातही धरणात ७ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याने १ जुलैपासून १० टक्के पाणी कपात लागू करण्यात आली होती. मात्र जुलै महिन्यांत पावसाने दमदार हजेरी लावल्याने पाणीसाठा ८० टक्क्यांवर गेला आणि ८ ऑगस्ट रोजी पाणीकपात रद्द करण्यात आली. गेल्या महिनाभर धरणातील पाण्याच्या पातळीत समाधानकारक वाढ होत नसल्याने सप्टेंबर महिन्यानंतर आढावा घेत १० ते २० टक्के पाणी कपातीचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे; मात्र सप्टेंबर महिन्याच्या सुरवातीलाच धरण क्षेत्रात पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असल्याने सातही धरणातील पाणीसाठा ९६.२० टक्क्यांवर गेला आहे. त्यामुळे पुढील पावसाचा अंदाज लक्षात घेता मुंबईवरील पाणीकपातीचे संकट टळणार, असा विश्वास पालिकेच्या जल विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे.

९ सप्टेंबर रोजी सातही धरणातील पाणीसाठा ( दशलक्ष लिटर)

मोडक सागर - १, २८,९२५

अप्पर वैतरणा - १,९७,८३३

तानसा - १,४५,०८०

मध्य वैतरणा - १,८८,९००

भातसा - ६,९५,९१२

तुळशी - ८,०४६

विहार - २७,६९५

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in