मुंबईकरांचे जीवन तणावाखाली;पालिकेच्या सर्वेक्षणातून आली धक्कादायक माहिती समोर

मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना मुंबईकरांच्या राहणीमानात बदल होत आहेत.
मुंबईकरांचे जीवन तणावाखाली;पालिकेच्या सर्वेक्षणातून आली धक्कादायक माहिती समोर

घडाळ्याच्या काट्यावर धावणाऱ्या मुंबईत अवेळी खाद्य, जंकफूड, कामाचा ताण यामुळे मुंबईकर तणावाखाली जीवन जगत आहेत. पालिकेने पाच हजार जणांचे स्टेप सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात ३४ टक्के मुंबईकर हायपर टेन्शनचे शिकार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरम्यान, हायपर टेन्शन, अर्थात मुंबईकरांना तणावमुक्त करण्यासाठी आशा वर्कर्स आणि सीएचव्ही वर्कर्स घरोघरी जाऊन समुपदेशन, ब्लड प्रेशरची तपासणी करणार असून, औषधोपचार करणार असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीवकुमार यांनी दिली.

मुंबईचा विकास झपाट्याने होत असताना मुंबईकरांच्या राहणीमानात बदल होत आहेत. त्यात घरची आर्थिक परिस्थिती हाताळणे, कामाचा ताण यामुळे मुंबईकरांमध्ये टेन्शन वाढत असल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे. मुंबई तणावमुक्त करण्यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. ‘आशा’ आणि ‘सीएचव्ही’ना आवश्यक ट्रेनिंग दिले जाणार आहे. त्यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन केलेल्या जाणाऱ्या तपासणीत ब्लड प्रेशर कमी किंवा जास्त आढळल्यास त्यांना पालिकेच्या रुग्णालयांच्या माध्यमातून मोफत वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. या मोहिमेत रुग्णावर केलेल्या उपचारांच्या परिणामांचा आढावा घरोघरी जाऊन घेण्यात येणार आहे. या मोहिमेत सहभागी होण्यासाठी नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येणार आहे. या मोहिमेत कालांतराने कॅन्सर, ब्रेस्ट कॅन्सर, सर्व्हायकल कॅन्सर, मधुमेह यासह इतर आजारांचाही समावेश केला जाणार असल्याचे डॉ. संजीव कुमार यांनी सांगितले. यावेळी वैद्यकीय शिक्षण व प्रमुख रुग्णालये संचालक डॉ. नीलम अंद्राडे, कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे, सार्वजनिक आरोग्य उपायुक्त संजय कुऱ्हाडे आदी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in