कोकणात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संकेत

या प्रकल्पाबाबत कंपनीचे व्यवस्थापन, ग्रामस्थ यासह सर्व भागधारकांची बैठक बोलवण्यात येणार आहे
कोकणात मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे संकेत

शिवसेनेने विरोध केल्यानंतर कोकणातील नाणार तेल शुद्धीकरण प्रकल्प बासनात गुंडाळला गेला. आता शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर त्यांनी कोकणात बारसू येथे मोठा तेल शुद्धीकरण प्रकल्प उभारण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी स्वातंत्र्यदिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात याबाबतचे संकेत दिले.

या प्रकल्पाबाबत कंपनीचे व्यवस्थापन, ग्रामस्थ यासह सर्व भागधारकांची बैठक बोलवण्यात येणार आहे. प्रकल्पाबाबतच्या त्यांच्या मनातील शंका दूर केल्या जातील. नाणारच नव्हे, तर प्रत्येक प्रकल्पाविषयी गैरसमज दूर केले जातील. त्यामुळे कोकणातील बेरोजगारीचा प्रश्न सुटू शकेल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी सांगितले. एमआयडीसीने बारसू येथे प्रस्तावित रिफायनरीसाठी सांख्यिकी अभ्यास सुरू केला आहे. या ठिकाणी हा प्रकल्प प्रस्तावित असू शकतो. यामुळे हजारो जणांना रोजगार मिळू शकतो. या प्रकल्पाबाबत असलेले गैरसमज दूर करून तो मार्गी लावण्याचे माझे प्रयत्न आहेत. राज्याचा उद्योगमंत्री म्हणून अधिकाधिक गुंतवणूक आकर्षित करणे व राज्यातील बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रयत्न करणे माझे कर्तव्य आहे, असे सामंत यांनी सांगितले.

केंद्राने सहकार्य करावे

प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारमार्फत प्रयत्न करावेत, असे सामंत म्हणाले.

क्षमता कमी केल्यास तीन कंपन्यांनी प्रकल्प उभारावा

या प्रकल्पाची उत्पादन क्षमता २० दशलक्ष टनापर्यंत कमी करणार असल्यास हा प्रकल्प आयओसी, बीपीसीएल व एचपीसीएल कंपन्यांना उभारणीचे आदेश द्यावेत, अशी विनंती राज्य सरकारने केंद्रीय पेट्रोलियम खात्याला केली आहे. आता सर्व निर्णय केंद्र सरकारने घ्यायचा आहे, असे हा अधिकारी म्हणाला.

गेल्याच महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे व भाजपचे आमदार प्रमोद जठार यांनी केंद्रीय पेट्रोलियममंत्री हरदीप पुरी यांची भेट घेऊन कोकणात तेलशुद्धीकरण कारखान्याबाबत चर्चा केली होती. भारतीय तेल वितरण कंपन्यांनी हा प्रकल्प उभारावा, अशी मागणी पेट्रोलियम खात्याकडे केली आहे.

सौदी अर्माकोने अंग काढले

या प्रकल्पात सौदी अर्माकोसोबत इंडियन ऑईल, बीपीसीएल व एचपीसीएल आदी कंपन्या सहभागी होणार होत्या; मात्र भूसंपादनाला होणारा विलंब लक्षात घेता सौदी अर्माकोने या प्रकल्पातून अंग काढून घेतले. कारण कंपनीने केंद्रीय पेट्रोलियम खात्याला सांगितले की, भूसंपादनात विलंब होत राहिल्यास प्रकल्पाला १५ वर्षे लागतील. या प्रकल्पात तीन लाख कोटी रुपयांची गुंतवणूक होणार होती. ६० दशलक्ष टन तेल शुद्धीकरण करणारी ही जगातील सर्वात मोठी रिफायनरी असणार होती, असे उद्योग खात्याच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in