नौदलातर्फे आपल्या सैनिकांसाठी ४२ मजल्यांचा टॉवर उभारला जाणार

नौदलातर्फे आपल्या सैनिकांसाठी ४२ मजल्यांचा टॉवर उभारला जाणार

कुलाबा येथे नौदलातर्फे आपल्या सैनिकांसाठी ४२ मजल्यांचा टॉवर बांधला जात आहे. या टॉवरचे भूमिपूजन नुकतेच करण्यात आले. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित होते. या प्रकल्पावरून आता वाद पेटला आहे. नौदल स्वत:साठी ४२ मजल्याचा टॉवर उभारू शकते, तर संरक्षण क्षेत्राच्या जवळ कायदेशीर इमारतीत राहणाऱ्या नागरिकांना इमारत पुनर्वसन प्रकल्पासाठी परवानगी का मिळत नाही, असा सवाल रहिवाशांनी केला आहे.

संरक्षण खात्याच्या आस्थापनाजवळ घाटकोपरच्या नयानगर भागात राहणारे जितेंद्र सोनेजी म्हणाले की, “घाटकोपर पूर्व-पश्चिमेकडील ९०० इमारतींचा विकास संरक्षण खात्याच्या नियमांमुळे अडकून पडला आहे. त्यातील अनेक इमारती पडल्या आहेत; पण निर्बंधामुळे पुनर्वसन मार्गी लागत नाही. उंचीवर निर्बंध असल्याने कोणताही विकासक पुढे यायला तयार नाही. यातील बहुतांश इमारती या ‘सी-१’ अतिधोकादायक इमारतीत मोडतात.

जुहूला राहणारे भूपेंद्र लकडवाला यांनी पंतप्रधान कार्यालय व संरक्षण खात्यांना अनेक पत्रे लिहिली आहेत. “जुहूला वायरलेस सिग्नलिंग कार्यालय आहे. त्यामुळे कोणत्याही इमारतीला पुनर्विकासासाठी परवानगी मिळत नाही. या इमारती धोकादायक असून, त्या कधीही कोसळू शकतात. संरक्षण खाते त्यांच्या कर्मचाऱ्यांना टॉवरला परवानगी देऊ शकतात. तर सर्वसामान्य माणसाला का नाही. आम्हाला सापत्नपणाची वागणूक का दिली जात आहे,” असा प्रश्न त्यांनी केला.

कुलाबा येथे म्हाडाला नवीन ट्रान्झिट इमारतीसाठी कुलाबा येथील संरक्षण खात्याकडून परवानगी मागितली आहे. ही इमारत तळमजला अधिक सात मजली आहे. दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वत: नवी दिल्लीत संरक्षणमंत्र्यांना पत्र लिहिले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in