सफाई कामगारांचा आता नवीन लुक ; २७ हजार सफाई कामगारांना कलरफूल गणवेश

मुंबई महापालिकेच्या 'ए' वॉर्डात प्रायोगिक तत्त्वावर येथील सफाई कामगारांना नवीन गणवेश देण्यात आला
सफाई कामगारांचा आता नवीन लुक ; २७ हजार सफाई कामगारांना कलरफूल गणवेश

मुंबई : चकाचक व सुंदर मुंबईसाठी रात्रंदिवस स्वच्छतेची जबाबदारी पार पाडणारे सफाई कामगार आता नवीन लुक मध्ये दिसणार आहेत. वर्षानुवर्षे खाकी गणवेश बदलून आता कलर फूल गणवेश देण्यात येणार आहे. मुंबई महापालिकेच्या 'ए' वॉर्डात प्रायोगिक तत्त्वावर येथील सफाई कामगारांना नवीन गणवेश देण्यात आला असून, लवकरच पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील २७ हजार सफाई कामगारांना नवीन गणवेश देण्यात येणार असल्याची माहिती पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने दिली.

स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी महापालिकेतील सफाई कामगार रात्रंदिवस झटत असतात. पहाटेपासून ते रात्रीपर्यंत मुंबईच्या सफाईसाठी २७ हजार कामगार आपली जबाबदारी पार पाडतात. मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागात कायमस्वरुपी २७ हजार सफाई कामगार कार्यरत आहेत. स्वच्छ मुंबईसाठी रात्रंदिवस मेहनत करणाऱ्या सफाई कामगार वर्षानुवर्षे खाकी गणवेश वापर आहेत. त्यामुळे नवीन गणवेश देण्याबाबत चर्चेत निर्णय झाला असून, नवीन गणवेश बाबत सफाई कामगारांच्या संघटनांकडून हरकती सूचना मागवल्या आहेत. हरकती सूचना प्राप्त झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेण्यात येईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.

दरम्यान, पालिकेच्या २४ वॉर्डात २७ हजार सफाई कामगार कार्यरत असून, प्रत्येक कामगारांच्या साईजनुसार गणवेश देणे गरजेचे आहे. गणवेश शिऊन देणे किंवा रोख पैसे देणे याबाबत निर्णय होणे आहे. परंतु वर्षानुवर्षे खाकी गणवेश आता बदलण्यात येणार असून, नवीन गणवेश देण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

दररोज ६ हजार मेट्रिक टन कचरा होतो गोळा

मुंबई शहर व दोन्ही उपनगरातून अगदी गल्लीबोळातील कचरा गोळा करण्याचे काम सफाई कामगार करत असतात. मुंबईतून दररोज ६ हजार मेट्रिक टन कचरा गोळा होतो. जमा होणारा कचरा डंपर मध्ये टाकून तो डम्पिंग ग्राऊंडवर पोहोचवण्याची जबाबदारी सफाई कामगार पार पाडतात. नेहमीच स्वच्छ व सुंदर मुंबईसाठी सफाई कामगार झटत असतात; मात्र त्याचा गणवेश वर्षानुवर्षे खाकी आहे. त्यामुळे नवीन गणवेश देण्याबाबत निर्णय झाला असून, लवकरच पालिकेच्या २४ वॉर्डातील सफाई कामगारांना गणवेश वाटप करण्यात येईल, असे अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in