
शिवसेनेच्या १६ बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्यात यावी, यासाठीची कायदेशीर प्रक्रिया शिवसेना पक्षातर्फे सुरू करण्यात आली आहे. बंडखोर आमदारांनी केवळ दोन तृतीयांश बहुमत दाखविल्याने त्यांच्यावरची कारवाई थांबणार नाही. त्यांना कोणत्या तरी पक्षात विलीनच व्हावे लागेल; अन्यथा त्यांच्यावर अपात्रतेची कारवाई होईल, अशी माहिती शिवसेनानेते अरविंद सावंत व शिवसेनेचे वकील देवदत्त कामत यांनी पत्रकारांना दिली. आता ही राजकीय लढाई राहिलेली नसून कायदेशीर लढाई सुरू झाली असल्याचेही सावंत म्हणाले. शिवसेनेने आता बंडखोर आमदारांवर कायदेशीर कारवाईचा बडगा उगारला आहे. यासंदर्भात शिवसेना भवनात नेत्यांची एक बैठक झाली. या बैठकीला कायदेतज्ज्ञ-देखील उपस्िथत होते.बैठकीनंतर अरविंद सावंत आणि देवदत्त कामत यांनी माहिती देताना सांगितले की, ‘‘शिवसेनेने १६ बंडखोर आमदारांवर अपात्रतेची कायदेशीर प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी केवळ सभागृहातले वर्तनच ग्राह्य धरता येत नाही, तर सभागृहाबाहेरील आमदारांचे वर्तनही ग्राह्य धरण्यात येते. देशात याआधी अशा घडलेल्या प्रकरणांत कारवाई करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाचेही निकाल त्यासंदर्भात आहेत. तसेच केवळ दोन तृतीयांश बहुमत दाखवून अपात्रतेची कारवाई टाळता येणार नाही. त्यासाठी त्यांना कोणत्यातरी पक्षात विलीन होणे हा एकमेव मार्ग आहे. २००३ सालापर्यंतच फक्त फुटीची परवानगी होती.