धावपट्टीवर घसरून विमान कोसळले; आठ जण जखमी विमानतळ तपासणीसाठी तात्पुरता बंद

विमानतळ तपासणीसाठी काहीकाळ तात्पुरता बंद करण्यात आला होता
धावपट्टीवर घसरून विमान कोसळले; आठ जण जखमी विमानतळ तपासणीसाठी तात्पुरता बंद

मुंबई : विशाखापट्टणहून मुंबईला आलेले एक खासगी विमान मुंबई विमानतळावर उतरत असताना कोसळले. या दुर्घटनेत आठ जण जखमी झाले असून त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. व्हीएसआर लिअरजेट ४५ व्हीटी -डीबीएल नावाचे हे विमान मध्यम आकाराचे होते. गुरुवारी सायंकाळी पावणेसहा वाजता २७ क्रमांकाच्या रनवेवर हा अपघात घडला. विमानात सहा प्रवासी आणि २ विमान कर्मचारी होते. विमानतळ तपासणीसाठी काहीकाळ तात्पुरता बंद करण्यात आला होता.

विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये पाहिले असता विमानाचा उजवा पंख रनवेला आदळून नंतर विमानाची पुढची बाजू आणि पोटाकडील भाग जमिनीला घासला गेला. यामुळे धुळीचा मोठा लोट उडाला. अपघातानंतर विमानाच्या मधल्या भागाचे दोन तुकडे झाल्याचे दिसून आले. विमानातील पायलट व सहपायलट यांसह इतर सहाही प्रवासी जखमी झाले असून त्यांना अंधेरी पूर्व येथील क्रिटीकेअर एसिया हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. हे विमान सेवेतून बाद करावे लागणार आहे. लिअरजेट ४५ एअरक्राफ्ट व्हीटी-डीबीएल हे विमान व्हीएसआर व्हेंचर्स कंपनीच्या मालकीचे आहे. विमान उतरत असताना जोरदार पाऊस होता. त्यामुळे केवळ ७०० मीटरपर्यंतच स्पष्ट दिसत होते, अशी माहिती डायरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल अॅव्हिएशन अर्थात डीजीसीएने दिली आहे. डीजीसीएच्या अधिकाऱ्याने प्राथमिक तपासणी केली आहे.

प्रवाशांची नावे

ध्रुव कोटक, लार्स सोरेनसेन, केके कृष्णादास, आकर्ष शेठी, अरुल साली, कामाक्षी अशी जखमी झालेल्या प्रवाशांची नावे आहेत. तर कॅप्टन नील आणि कॅप्टन सुनील अशी वैमानिकांची नावे आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in