
मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी हनुमान चालीसाचे पठण करण्याच्या वादात अडकलेल्या आणि जामिनावर सुटका झालेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. राणा दाम्पत्याने न्यायालयाने जामीन मंजूर करताना घातलेल्या अटींचा भंग केल्याने जामीन रद्द करावा, अशी विनंती करणाऱ्या मुंबई पोलिसांनी दाखल केलेल्या अर्जाची सत्र न्यायालयाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी दखल घेत राणा दाम्पत्याला जामीन रद्द का करू नये, अशी विचारणा करणारी नोटीस बजावली आहे. त्यांना १८ मे रोजी न्यायालयात हजर राहून भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठणाचे आंदोलन आमदार रवी राणा आणि त्यांच्या पत्नी खासदार नवनीतकौर राणा यांनी पुकारले होते. कायदा आणि सुव्यवस्था बिघडवल्याचा ठपका ठेवत मुंबई पोलिसांनी राणा दाम्पत्याविरोधात आयपीसी कलम १५३(अ), ३४, ३७ सह मुंबई पोलीस कायदा १३५ अंतर्गत गुन्हा दाखल केला. त्यानंतर आयपीसी कलम १२४ (अ)अंतर्गत राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. सत्र न्यायालयाने गेल्याच आठवड्यात या प्रकरणी राणा दाम्पत्याला सशर्त जामीन मंजूर करताना प्रसार माध्यमांशी बोलण्यास मनाई केली होती; मात्र राणा दाम्पत्याने जामिनावर सुटका झाल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.
याची दखल घेत राज्य सरकारच्या वतीने अॅड. प्रदीप घरत यांनी सत्र न्यायालयात जामीन रद्द करण्यासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर न्यायमूर्ती राहुल रोकडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी अॅड. घरत यांनी राणा दाम्पत्याने न्यायालयाने जामीन देताना घातलेल्या अटींचे उल्लंघन केल्याचा आरोप करून जामीन तत्काळ रद्द करा. त्यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्याची विनंती केली. याचिकेची न्यायालयाने दखल घेत राणा दाम्पत्याला नोटीस जारी करत त्यांचा जामीन का रद्द करू नये? त्याबाबत भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले. तसेच १८ मे रोजी न्यायालयात हजर राहण्याचे निर्देश दिले.