ठाण्यातील क्लस्टरची जबाबदारी महाप्रितवर ;राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

महाप्रितच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे बांधण्यात येणार असल्याचा दावा सरकारने केला
ठाण्यातील क्लस्टरची जबाबदारी महाप्रितवर ;राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

मुंबई: महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा आणि पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित अर्थात महाप्रितवर ठाण्यातील समूह गृहनिर्माण प्रकल्प (क्लस्टर) राबविण्याची जबाबदारी सोपविण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विधानसभा मतदारसंघ असलेल्या कोपरी-पाचपाखाडीतील किसननगर १, किसननगर २ हाजुरी येथे क्लस्टरच्या माध्यमातून जुन्या, जीर्ण आणि धोकादायक इमारतींचा पुनर्विकास करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी पहिल्या टप्प्यातील काम सिडकोकडे सोपविण्यात आले आहे. मात्र, दुसऱ्या टप्प्यातही खासगी विकासक पुढे येत नसल्याने सरकारने ठाण्यातील क्लस्टरचे काम महाप्रितकडे सोपविण्यात आल्याचे सांगण्यात आले. आता महाप्रितच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर परवडणारी घरे बांधण्यात येणार असल्याचा दावा सरकारने केला आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाला अधिक कार्यक्षम करण्यासाठी आणि नवीन योजना राबविण्यासाठी महात्मा फुले नविनीकरणीय ऊर्जा व पायाभूत प्राद्योगिकी मर्यादित-महाप्रित या सहयोगी कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीमार्फत परवडणारी घरे आणि शहरी नियोजन, अक्षय ऊर्जा, कृषिमूल्य साखळी, पायाभूत सुविधा प्रकल्प, पर्यावरण उद्योन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रे आदी विविध शासकीय कामे करण्यास १० जुलै २०२३ मध्ये मान्यता देण्यात आली आहे. यालाच अनुसरून ठाणे शहरातील टेकडी बंगला, हजुरी आणि किसननगर येथे एकत्रित विकास नियंत्रण नियमावलीमध्ये समूह विकास प्रकल्प राबविण्यासाठी ठाणे महापालिकेसोबत सामंजस्य करार करण्यात आला आहे. हा प्रकल्प राबविण्यास त्याचप्रमाणे महात्मा फुले मागासवर्ग महामंडळाकडील ठेवींवर मिळणाऱ्या व्याजाच्या रकमेतून २५ कोटी इतक्या रकमेची तीन वर्षांत व्याजासह परतफेड करण्याच्या तत्त्वावर या प्रकल्पास मान्यता देण्यात आली आहे.

logo
marathi.freepressjournal.in