कल्याण मधील रेल्वे यार्ड परिसरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण नागरीकांमध्ये भीतीचे सावट

कल्याण मधील रेल्वे यार्ड परिसरात गुन्हेगारीचे वाढते प्रमाण नागरीकांमध्ये भीतीचे सावट

मुंबईची लाईफलाईन असलेल्या मुंबई उपनगरीय रेल्वेवरील कल्याण स्थानक हे मध्य रेल्वेच्या सर्वात व्यस्त जंक्शनांपैकी एक आहे. या स्थानक परिसरातील कल्याण यार्डचा पुनर्विकास अनेक वर्षांपासून रखडला आहे. परिणामी, हा यार्ड परिसर बकाल होत गुन्हेगारीचे माहेरघर म्हणून ओळखले जाऊ लागले आहे. गर्दुल्ले, दारुडे यांचा हा अड्डा झाला असून, कल्याण रेल्वे यार्डामध्ये गेल्या १० वर्षांत सातत्याने गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे.

यामध्ये अमली पदार्थांची विक्रीपासून ते मारामाऱ्या, खून, बलात्कार सारख्या गंभीर घटना या ठिकाणी घडत आहेत. यामुळे या परिसरातून दैनंदिन प्रवास करणारे प्रवासी आणि कर्मचारी आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करत आहेत. उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या मिळून जवळपास ८०० गाड्या दररोज कल्याण रेल्वे स्थानकात थांबतात. ठाकुर्ली दिशेकडील वीजकेंद्रापासून ते कल्याण पूर्वेकडील रेल्वे यार्डापर्यंतचा मोठा विस्तीर्ण परिसर आहे; परंतु सर्व सोयीसुविधा असलेल्या या कल्याण स्थानकाचा यार्ड परिसर अनेक वर्षांपासून पुनर्विकासाअभावी रखडलेल्या अवस्थेत आहे. रेल्वे प्रशासनाकडून दुर्लक्षित झालेल्या यार्ड परिसराला सध्या भकास रूप प्राप्त झाले आहे. याचाच गैरफायदा काही दारुडे, गर्दुल्ले यांनी घेत या यार्डला आपला अड्डा बनवत या ठिकाणी नशा करणे, येणाऱ्या-जाणाऱ्या नागरिकांची थट्टा उडवणे, चोऱ्या करणे तसेच खून, बलात्कार सारख्या घटनांची नोंददेखील या यार्ड परिसरातून करण्यात आली आहे.

७ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास रेल्वे यार्डातील बोगद्यातून पायी जाणाऱ्या ३३ वर्षीय व्यक्तीला तिघांनी चाकूचा धाक दाखवत मोबाइल फोन, रोख रक्कम जबरदस्तीने काढून घेतली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे; परंतु त्यानंतरही या भागातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली नसल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

निष्क्रिय सुरक्षा यंत्रणेची परंपरा कायम

लांबपर्यंत आणि भुसावळनंतर सर्वाधिक यार्ड परिसर लाभलेल्या स्थानकांमध्ये कल्याण स्थानकाचा समावेश होतो. एकेकाळी मालगाड्या थांबण्याच्या या ठिकाणी कोळशाच्याही भल्या मोठ्या गाड्या लुटल्या जात होत्या. मालगाड्यांवरील हल्ले आणि लूटमारीच्या घटनांसाठी कुप्रसिद्ध ठरलेल्या या भागातील सुरक्षायंत्रणा सक्षम करण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि कोळसेवाडी पोलीस प्रशासनाकडून अनेक प्रयत्न करण्यात आले; मात्र रेल्वे पोलिसांचे या भागात नियमित कोणतेही नियंत्रण नसल्यामुळे या भागातील गुन्हेगारी घटना सातत्याने समोर येत आहेत.

कल्याण पूर्वेकडील बोगद्यातील गुन्ह्यांबाबतच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर या परिसरातील बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. कल्याण पश्चिमेकडील स्थानक परिसरातून येणाऱ्या महिलांच्या सुरक्षाव्यवस्थेबाबत तातडीने उपाययोजना केल्या जातील. याबाबत संबंधित पोलीस ठाण्यांना सूचना देण्यात येतील.

- सचिन गुंजाळ, उपायुक्त, कल्याण झोन-३

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in