म्हाडा व एसआरएच्या भूखंडावरील इमारतीत शाळेची घंटा वाजणार

इमारतींचा ताबा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.
म्हाडा व एसआरएच्या भूखंडावरील इमारतीत शाळेची घंटा वाजणार

शाळांचा दर्जावाढीबरोबर आता पालिका शाळेच्या वर्गसंख्येत वाढ होणार आहे. म्हाडा व एसआरएच्या आरक्षित भूखंडावरील इमारतीत शाळेची घंटा वाजणार आहे. शहर व दोन्ही उपनगरात म्हाडा व एसआरएने बांधलेल्या ६५ इमारतींमध्ये आठ वर्ग सुरू करण्यात इमारतींचा ताबा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्याची माहिती पालिकेच्या शिक्षण विभागाचे सहआयुक्त अजित कुंभार यांनी दिली.

कोरोनाकाळात पालिका शाळांतील विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात तब्बल एक लाख २५ नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतल्याने पालिका शाळांतील विद्यार्थी संख्या तीन लाख ६० हजारांवर पोहोचली आहे. पालिका शाळांत मुलाला पाठवण्यास पालकांनी पसंती दिली आहे. त्यामुळे विद्यार्थीवाढीनंतर शाळांतील वर्गवाढीवर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रित केले आहे. मुंबई व उपनगरांतील काही आरक्षित भूखंडावर म्हाडा व एसआरएने बांधलेल्या इमारती पालिकेला शाळांसाठी हस्तांतरित केल्या जाणार आहेत. परवानग्या व इतर कारणांमुळे या इमारतींचा ताबा मागील काही वर्षे रखडला होता; मात्र आता या प्रक्रियेला वेग आला आहे. शहर, पूर्व उपनगर व पश्चिम उपनगर परिसरात एकूण ६५ इमारती बांधून तयार आहेत. तीन ते सातमजली या इमारतींच्या सर्व मजल्यांवर पालिकेच्या शाळा भरणार आहेत. यातील आठ इमारतींचा ताबा पालिकेला मिळाला असून त्यात वर्गही सुरू झाले आहेत.

सोयीसुविधांसह आनंददायी वातावरण असलेल्या या शाळांच्या इमारतींचा ताबा मिळाल्याने पालिकेला योग्य वेळी वर्ग सुरू करता आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. शाळांची पटसंख्या वाढत असल्याने इमारतींची आवश्यकताही भासणार आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित इमारतींचा ताबा घेण्याची प्रकियाही वेगाने सुरू आहे. आवश्यक परवानग्या मिळाल्यानंतर या सर्व इमारती पालिकेच्या ताब्यात येतील, असे कुंभार यांनी सांगितले.

म्हाडा व एसआरएने आरक्षित भूखंडावर इमारती बांधल्या आहेत. यात बृहन्‍मुंबई महानगरपालिकेच्‍या शिक्षण विभागाला ६५ इमारती मिळणार आहेत. ६५ पैकी आठ इमारतींचा ताबा मिळाला असून या इमारतीत शाळाही सुरू झाल्या आहेत. हस्तांतरित प्रक्रिया पूर्ण झाल्यावर टप्प्याटप्प्याने उर्वरित इमारतीही शिक्षण विभागाच्या ताब्यात मिळतील.

- अजित कुंभार, सह आयुक्त,

पालिका शिक्षण

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in