
मुंबई : शिवसेना सोडून जाणाऱ्या सर्व ४० आमदारांनी अजित पवार निधी देत नसल्याचे कारण दिले होते. मात्र, आता अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी त्यांच्यासोबत आलेल्या आमदारांना मतदारसंघात २५ ते ५० कोटींच्या निधीचे वाटप तर केले आहेच, पण राष्ट्रवादी काँग्रेसमधील त्यांच्यासोबत न आलेल्या आमदारांनाही चांगला निधी दिला आहे. मग त्यावेळी शिंदे गटाचे जे आमदार निधी वाटपावरून टाहो फोडत होते, त्यांनी आता त्यांची भूमिका स्पष्ट करावी, असे आव्हान विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिले आहे. ठाकरे गटाच्या आमदारांना अद्यापही निधी वाटपात सापत्न वागणूकच मिळते आहे. या मतदारसंघातील जनतेवर अन्याय का, असा सवालही दानवे यांनी केला आहे.
आघाडी सरकारच्या काळात अजित पवार यांच्याकडून निधी वाटपात अन्याय होत असल्याचे मुख्य कारण शिंदे गटातील आमदारांनी दिले होते. मात्र आता अजित पवार पुन्हा उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री झाले आहेत. त्यांनी परत निधी वाटप करताना आपल्यासोबत आलेल्या तसेच राष्ट्रवादीतील सोबत न आलेल्या अशा सर्वच ५४ आमदारांना २५ ते ५० कोटींपर्यंतचा विकासनिधी दिला असल्याचे अंबादास दानवे म्हणाले आहेत. त्यावेळी जे निधी वाटपात अन्याय झाल्याचा टाहो फोडत होते अशा शिंदे गटातील आमदारांनी आता त्यावर त्यांची भूमिका स्पष्ट करावी. उद्धव ठाकरेंसोबत जे आमदार राहिले त्यांना या वर्षभरात कोणताही निधी दिलेला नाही. जिल्हा नियोजन मंडळात देखील सापत्न वागणूक दिली जाते. सरकारकडून मंजूर झालेल्या कामांवरील स्थगितीही उठवलेली नाही. आम्ही अधिवेशनातही हा मुद्दा उठवू. या मतदारसंघात जनता राहत नाही का. या मतदारसंघात सत्ताधाऱ्यांनाही मतदान करणारी जनता राहते ना. अशा पद्धतीने जर निधीचे वाटप होत असेल तर तो अन्याय आहे. आपला वैचारिक विरोध आहे. वैयक्तिक दुष्मनी नाही. आम्ही हे जनतेला सांगू. केवळ चार-पाच कोटींच्या आमदार निधीवरच ठाकरे गटाचे आमदार काम करत असल्याचेही दानवे म्हणाले.
दरम्यान, एकनाथ शिंदे यांना एका वर्षासाठीच मुख्यमंत्रिपद देण्यात येणार होते. तसेच आधी ठरले होते. अजित पवार हे काही उपमुख्यमंत्री होण्यासाठी सरकारसोबत गेलेले नाहीत. त्यांनी याआधी अनेकवेळा उपमुख्यमंत्रिपद भूषविले आहे. अजित पवार हे मुख्यमंत्री होण्यासाठीच सरकारमध्ये गेले आहेत. दिल्लीच्या दरबारात, भाजपमध्ये, दिल्लीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये तसेच पत्रकारांमध्येही हीच चर्चा असल्याचेही अंबादास दानवे म्हणाले.