तिकीट दलालांच्या मुसक्या आवळल्या! ८ महिन्यांत १२८ दलालांना अटक ६४ लाखांची २,८५० तिकिटं जप्त

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तिकीट दलालांवर लक्ष केंद्रित केले आहे
तिकीट दलालांच्या मुसक्या आवळल्या! ८ महिन्यांत १२८ दलालांना अटक ६४ लाखांची २,८५० तिकिटं जप्त

मुंबई : तिकीट दलालांविरोधात मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने (आरपीएफ) विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेंतर्गत एप्रिल ते नोव्हेंबर या आठ महिन्यांत तब्बल १२८ तिकीट दलालांना अटक करण्यात आली. तिकीट दलालांकडून २,८५० तिकिटं जप्त केली असून ६४ लाख ६१ हजार २०३ रुपये दंड वसूल केल्याचे मध्य रेल्वेकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या मध्य रेल्वे प्रशासनाने तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या तिकीट दलालांवर लक्ष केंद्रित केले आहे. प्रवाशांचे हित जपण्यासाठी दलालांविरुद्ध मोहीम तीव्र केली आहे. सायबर सेलकडून मिळालेल्या माहिती आणि इतर बाबींच्या आधारे मध्य रेल्वे मुंबई विभागाच्या रेल्वे सुरक्षा बलाने छापे टाकले. या छापेमारीत प्रामुख्याने मुंबई विभागातील खासगी ट्रॅव्हल्स एजन्सींचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत एकूण २८५० तिकिटे जप्त करण्यात आली असून ६४,६१,२०३ इतकी रक्कम दंड म्हणून वसूल केली, तर एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ पर्यंत ३२८० तिकिटे आणि ६२,१५,१८८ दंड वसूल करण्यात आला. रेल्वे सुरक्षा बलाच्या आयटी सेल कर्मचारी आणि कौशल्य विकास केंद्राची एक टीम PRABAL आणि त्यासारख्या इतर विविध सॉफ्टवेअरने सुसज्ज ई-टाऊटिंग तपास करणे, सायबरस्पेसमार्फत पाळत ठेवणे, सीसीटीव्हीद्वारा निरीक्षण आदी कामांत चांगली कामगिरी बजावली आहे.

नोव्हेंबर २०२२ मध्ये अशाप्रकारची ८ प्रकरणे होती, तर त्याच तुलनेत नोव्हेंबर २०२३ मध्ये रेल्वे सुरक्षा बल, मुंबई विभागाने रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अंतर्गत दलालाच्या एकूण १० प्रकरणांचा छडा लावला. रेल्वे कायद्यांतर्गत ११ जणांना अटक करण्यात आली होती. या दलालांकडून ३,७८,७४७ रुपये किमतीची १७९ तिकिटं जप्त केल्याचे मध्य रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

एप्रिल ते नोव्हेंबर २०२२ या कालावधीत दलालीचे ९६ गुन्हे दाखल करून ११५ जणांना अटक करण्यात आली, त्याच तुलनेत चालू वर्षात एप्रिल २०२३ ते नोव्हेंबर २०२३ या कालावधीत रेल्वे कायद्याच्या कलम १४३ अन्वये दलालीची १०७ प्रकरणे नोंदवण्यात आली आणि १२८ जणांना अटक करण्यात आली.

...तर प्रवाशांवर दंडात्मक कारवाई!

मध्य रेल्वेने प्रवाशांना वैध रेल्वे तिकीट घेऊन प्रवास करण्याचे आवाहन केले आहे. अनधिकृत एजंट किंवा दलालांकडून तिकीट खरेदी करू नये. कारण यामुळे प्रवासात अडथळा निर्माण होऊ शकतो आणि रेल्वे अधिकाऱ्यांकडून कायदेशीर कारवाई होऊ शकते आणि मोठा दंड वसूल केला जाईल, असा इशारा मध्य रेल्वे प्रशासनाने दिला आहे.

logo
marathi.freepressjournal.in