राज्य परिचारिका संघटनेचे सोमवार पासुन आंदोलन सुरु

 राज्य परिचारिका संघटनेचे सोमवार पासुन आंदोलन सुरु

कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया राबवण्यास राज्य परिचारिका संघटनेने विरोध केला आहे. कंत्राटी पद्धतीने भरती प्रक्रिया म्हणजे खासगीकरणाचा डाव असून कंत्राटी पद्धतीला विरोध करण्यासाठी सोमवार, २३ ते बुधवार, २५ मेदरम्यान राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येणार असल्याचा इशारा परिचारिका संघटनेने दिला आहे. दरम्यान, तीन दिवस आझाद मैदानात धरणे आंदोलन करण्यात येणार असून, त्यानंतर ही कंत्राटी पद्धत बंद न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे.

आरोग्य विभागात मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असताना ती भरण्यास प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे वाढत्या कामाचा भार कार्यरत असलेल्या परिचारिका, कर्मचाऱ्यांवर येतो. त्यामुळे ही पदे तत्काळ भरण्याची मागणी केली जात होती; मात्र ही पदे कंत्राटी पद्धतीने भरण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्याला संघटनेने तीव्र विरोध केला आहे. खासगीकरणाला विरोध दर्शवण्यासाठी महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने येत्या २३ ते २५ मेपासून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे. यादरम्यान शासनाने चर्चेसाठी वेळ दिला नाही, तर २८ मेपासून संपूर्ण राज्यात बेमुदत आंदोलन करण्यात येईल, असा इशारा संघटनेने दिला आहे. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या जे. जे. रुग्णालय शाखेच्या परिचारिकासुद्धा सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in