चारही बड्या पक्षांची रणनीती निश्चित

चारही बड्या पक्षांची रणनीती निश्चित

राज्यसभेच्या सहा जागांसाठी १० जून रोजी होत असलेल्या मतदानाबाबत महाविकास आघाडी आणि भाजप यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरू आहे. या निवडणुकीत सत्तापिपासू लोकांना सत्तेपासून दूर ठेवायचे असेल, तर महाविकास आघाडीतील सर्वांनी एकत्र राहणे गरजेचे आहे, असे आवाहन करतानाच आघाडीतील कुरबुरी मिटविण्याबाबत कार्यवाही करण्याचे आश्वासन सर्व नेत्यांनी त्यांच्या पक्षाच्या आमदारांना मंगळवारी दिले.

राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आघाडीतील सर्व आमदारांची बैठक दक्षिण मुंबईतील ट्रायडेंट या पंचतारांकित हॉटेलमध्ये झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे, एच. के. पाटील, बाळासाहेब थोरात, नाना पटोले, तर उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील आदी सर्वच ज्येष्ठ नेते उपस्थित होते. आघाडीमध्ये सर्व सुरळीत सुरू असून आमदारांनी चिंता करू नये, एकत्र राहून मविआ आणखी वाढवली पाहिजे, असे आवाहन शरद पवार यांनी यावेळी केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही यावेळी आमदारांना मार्गदर्शन केले.

बैठकीला बहुजन विकास आघाडी, समाजवादी पार्टी आणि एमआयएम या पक्षांचे आमदार गैरहजर होते. अन्य सर्व पक्ष आमदार या बैठकीला उपस्थित होते. २८९ सदस्यांच्या राज्य विधानसभेत २८७ आमदार मतदार आहेत. शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचे १५२ तर विरोधी बाकांवरच्या भाजपकडे १०६ सदस्यांचे बळ आहे. १३ अपक्ष व छोट्या पक्षांचे १६ सदस्य असून हे २९ आमदार राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी गेमचेंजर ठरणार आहेत. या २९ आमदारांना गळाला लावण्याचे भाजप व आघाडीचे युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत.

एकूण, चारही बड्या पक्षांची रणनीती निश्चित झाली असून आता अंमलबजावणी चालू आहे. शिवसेनेचा दुसरा उमेदवार पडल्यास आघाडी सरकारच्या स्थैर्यावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे अत्यंत सावध पावले टाकली जात आहेत.

शिवसेनेची रणनीती :

बविआ सारख्या बड्या पक्षांना मंत्रिपदाचे आमिष, महामंडळाचे अध्यक्षपद देण्याची तयारी, भरघोस विकास निधी, मतदारसंघातील विकासकामे मंजूर करण्यात येतील, पसंतीचे अधिकारी देण्यात येतील.

काँग्रेसची रणनीती :

पक्षाचा कोणी आमदार अनुपस्थित राहू नये, याची काळजी घेतली जाणार, विमानतळाजवळ हॉटेलात पक्षाच्या सर्व आमदारांना ठेवणार, ८ तारखेला मुंबईत पोहोचण्याचे आमदारांना आदेश, पक्षाची पहिल्या पसंतीची सर्व ४४ मते इमरान प्रतापगढी यांना मिळतील, असे नियोजन. एमआयएम आणि समाजवादी पक्षाची मते मिळवण्याचे प्रयत्न.

राष्ट्रवादीची रणनीती :

राष्ट्रवादी आपली शिल्लक नऊ मते शिवसेना उमेदवाराला देणार, स्वाभिमानी तसेच अपक्षपण सहयोगी आमदार यांची मते शिवसेनेला देणार, प्रफुल्ल पटेल पहिल्या फेरीत निवडून यावेत, यासाठी ४५पेक्षा अधिक पहिल्या पसंतीची मते देणार.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in