
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण या शहराची कीर्ती जगात पसरली आहे. पर्यटनासाठी तर हा जिल्हा जगाच्या नकाशावर आहेच; पण छत्रपती शिवाजी महाराजांनी समुद्रात उभारलेला सिंधुदुर्ग किल्लादेखील मालवणचे एक प्रमुख आकर्षण आहे. या किल्ल्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुरातन मंदिरही आहे; मात्र इतकी वर्षे या मंदिराला शासनाकडून वार्षिक केवळ सहा हजार ३० रुपयांचे तुटपुंजे वार्षिक अनुदान देण्यात येत होते. ते आता वाढवून तीन लाख रुपये करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्याला तत्त्वतः मंजुरी दिली असल्याची माहिती माजी मंत्री उदय सामंत यांनी दिली.
छत्रपती शिवाजी महाराजांनी सन १६६४ साली हिरोजी इंदुलकर यांना सिंधुदुर्ग किल्ला बांधण्याची आज्ञा दिली. मालवण किनाऱ्याच्या समोरच कुरटे बेट आहे. याच कुरटे बेटावर हा अभेद्य जलदुर्ग बांधण्यात आला. या किल्ल्याच्या तटबंदीच्या भिंतीची पायाभरणी साक्षात छत्रपती शिवाजी महाराजांच्या हस्ते झाली होती. कुरटे बेटाच्या ४५ एकर क्षेत्रफळावर हा किल्ला विस्तारला आहे. या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदिर आहे. या मंदिरांची दैनंदिन पूजाअर्चा, दिवाबत्ती, डागडुजी, वर्षभरात साजरे होणारे १२ प्रमुख उत्सव या साऱ्यांचे व्यवस्थापन श्री शिवराजेश्वर देवस्थान न्यासाच्या मार्फत करण्यात येते. त्यासाठी महाराष्ट्र सरकारकडून वार्षिक सहा हजार ३० रुपये इतकेच अनुदान देण्यात येत होते. सध्याच्या महागाईच्या जमान्यात हे सर्व पूर्वपरंपरेनुसार दिमाखात चालविण्यासाठी निधीची अत्यंत कमतरता भासत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे हा विषय उपस्थित केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने हा निधी तीन लाखांपर्यंत वाढविण्यास तत्त्वतः मंजुरी दिली असून, याबाबतचा शासननिर्णय लवकरच जारी होईल, अशी माहिती माजी मंत्री उदय सामंत यांनी दिली.