
मुंबई : पावसाने विश्रांती घेतली असली तरी पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा झपाट्याने फैलाव होत आहे. संपूर्ण जुलै महिन्यात मलेरियाचे ७२१, डेंग्यूचे ६८५, स्वाईन फ्लूचे १०६ रुग्ण आढळले होते. मात्र ऑगस्ट महिन्याच्या १५ दिवसांत मलेरियाचे ४६२, डेंग्यूचे ३१७, स्वाईन फ्लूचे ९० तर लेप्टोच्या १५१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यामुळे पावसाने उसंत घेतली असली तरी पावसाळी साथीच्या आजारांचे टेन्शन मात्र कायम आहे.
पावसाळ्यात उद्भवणाऱ्या साथीच्या आजारांचा प्रादूर्भाव कमी होईल, असे वाटत होते. मात्र संपूर्ण जुलै महिन्यात डेंग्यूचे ५७९, मलेरियाचे ७२१, लेप्टोचे ३७७, गॅस्ट्रोचे १६४९, कावीळ १३८, स्वाइन फ्ल्यू ८६ आणि चिकनगुनियाचे २४ रुग्ण आढळले होते. ही रुग्णवाढ ऑगस्टमध्येही कायम आहे.
पावसाचे पाणी साचून राहत असल्याने दूषित पाण्यामुळे गॅस्ट्रो, टायफॉइड, कॉलरा, कावीळ असे आजार तर किटकांच्या प्रभावामुळे मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया असे आजार पसरतात. पावसाळी आजार टाळण्यासाठी नागरिकांनी घर-परिसर स्वच्छ ठेवावा, पाणी साचू देऊ नये, डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषधे घेऊ नये, असे आवाहन पालिकेच्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.
१ ते १५ ऑगस्टपर्यंत आढळलेले रुग्ण
मलेरिया - ४६२
लेप्टो - १५१
डेंग्यू - ३१७
गॅस्ट्रो - ४२९
कावीळ - १५
स्वाईन फ्लू - ९०
चिकनगुनिया - ११