अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्याला विमानतळावर ताब्यात घेतले

राजनैतिक अधिकाऱ्यांनी आपली ओळख पटवल्यावर आमचे वरिष्ठ कस्टम अधिकारी घटनास्थळी पोहचले.
अमेरिकेच्या राजनैतिक अधिकाऱ्याला विमानतळावर ताब्यात घेतले

मुंबई : अमेरिकेच्या वरिष्ठ राजनैतिक अधिकारी वेंडी वॉशिंग्टन यांना मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ कस्टमने ताब्यात घेतल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.

अमेरिकेचे ज्येष्ठ राजनैतिक अधिकारी वेंडी वॉशिंग्टन या बीकेसीतील अमेरिकन वकीलातीत कार्यरत आहेत. २८ ऑक्टोबर २०२३ रोजी त्या बँकॉकहून मुंबईत उतरल्या. त्यावेळी त्यांच्या डिप्लोमॅटिक बॅग्ज व पाऊच स्कॅन करून त्याची तपासणी करण्यात आली. कस्टम अधिकाऱ्यांनी आपल्याला त्रास दिल्याचे तक्रार त्यांनी केली.

याबाबत मुंबईतील अमेरिकन वकीलातीने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर विमानतळ विभागाचे कस्टम आयुक्तांकडे कडक शब्दात पत्र पाठवले आहे. विमानतळावरील कस्टम अधिकाऱ्यांनी आपला छळ करून अवैधरित्या स्थानबद्ध केल्याचे पत्रात नमूद केले. हे राजनैतिक अधिकाऱ्यांसाठी आखून दिलेल्या जिनिव्हा कराराचे उल्लंघन असल्याचे म्हटले आहे.

वॉशिंग्टन या वरिष्ठ अधिकारी असून त्यांच्याकडे डिप्लोमॅटिक पासपोर्ट आहे. वॉशिंग्टन यांनी आरोप केला की, आपण राजनैतिक अधिकारी असतानाही कस्टम उपायुक्त संजीव छेतुले यांनी आपल्याला अर्धा तास स्थानबद्ध केले. तसेच त्यांचे बोलणे कठोर शब्दात होते. राजनैतिक वाद संपवण्यासाठी तिच्या वरिष्ठ दूतावासाच्या सुरक्षा अधिकाऱ्याने हस्तक्षेप करण्यासाठी बोलावले तेव्हा ते उद्धटपणे बोलले.

वरिष्ठ विमानतळ कस्टम अधिकाऱ्याने या बाबीला दुजोरा देताना सांगितले की, गैरसमजामुळे घडलेली ही घटना दुर्दैवी होती. आम्ही सर्व राजनैतिक शिष्टाचार व प्रक्रिया पाळतो. आमच्या वरिष्ठ कस्टम अधिकाऱ्याने वेंडी वॉशिंग्टन यांना वैयक्तिकरित्या भेटून झालेल्या प्रकाराची दिलगिरी व्यक्त केली.

विमानतळ कस्टम विभागाने सांगितले की, बँकाकहून आलेल्या विमानात सोन्याची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या राजनैतिक अधिकाऱ्यानेही सोन्याचे अनेक ब्रेसलेट व दागिने परिधान केले होते. त्यांना बाजूला होऊन सोन्याच्या दागिन्यांचे तपशील देण्यास सांगितले. त्यावेळी कमी प्रकाश असल्याने कस्टम अधिकाऱ्यांना राखाडी रंगाचा डिप्लोमॅटिक पासपोर्ट ओळखता आला नाही. त्यांनी त्यांची बॅग स्कॅनिंगला टाकण्यास सांगितले.

त्याचवेळी राजनैतिक अधिकाऱ्यांनी आपली ओळख पटवल्यावर आमचे वरिष्ठ कस्टम अधिकारी घटनास्थळी पोहचले. त्यांनी वॉशिंग्टन यांना राजनैतिक शिष्टाचारानुसार वागणूक दिली, अशी माहिती दुसऱ्या कस्टम अधिकाऱ्याने दिली.

तर मुंबई विमानतळ कस्टमने अमेरिकन राजनैतिक अधिकाऱ्याला सोन्याच्या ब्रेसलेट व दागिन्यांची माहिती देण्यास सांगण्यात कोणताही दुसरा हेतू नसल्याचे सांगितले. त्यांना सोन्याच्या ब्रेसलेटबाबत माहिती विचारताच त्यांनी गोंगाट सुरू केला. अमेरिकन वकीलातीने मुंबईत येणाऱ्या जारी केलेल्या शिष्टाचार यादीत त्यांचे नाव नव्हते. सर्व राजनैतिक अधिकाऱ्यांना सर्व नियमानुसार आवश्यक ते शिष्टाचार दिले जातात, असे विमानतळ कस्टमच्या राजशिष्टाचार अधिकाऱ्याने सांगितले.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in