अभियांत्रिकी अध्यापकांना पदोन्नती मिळण्याचा मार्ग झाला मोकळा

अभियांत्रिकी अध्यापकांना पदोन्नती मिळण्याचा मार्ग  झाला मोकळा

शासकीय आणि शासन अनुदानित अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयातील अध्यापकांचे पदोन्नती प्रस्ताव, तसेच सहाव्या वेतनानुसार २०१० पासून प्राध्यापक पदाची पदोन्नती प्रलंबित होती. त्यासंबंधात शासन निर्णय अद्यापपर्यंत जारी झाला नव्हता. अखेर ३ जून २०२२ रोजी इंजिनीअरिंग महाविद्यालयातील अध्यापकांचा पदोन्नतीचा शासन निर्णय जारी झाल्याने शासकीय आणि शासन अनुदानित अभियांत्रिकी पदवी महाविद्यालयातील अध्यापकांना पदोन्नती मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

या संदर्भात दि. ५ मे २०२२ रोजी आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी महाराष्ट्र धर्मनिरपेक्ष शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. विजय पवार यांच्या समवेत, उच्च व तंत्रशिक्षण प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी तसेच तंत्रशिक्षण संचालक डॉ. अभय वाघ यांची मंत्रालयात भेट घेतली होती. या भेटीत अध्यापकांचे प्रमोशन गेली अनेक वर्षे प्रलंबित असून लवकरात लवकर त्या संबंधी कार्यवाही करून तसा शासन निर्णय जारी करावा, अशी सूचना आमदार कायंदे यांनी केली. तसेच शिक्षणमंत्री कार्यालयातसुद्धा पाठपुरावा करण्यात आला. या बैठकीत संघटनेच्या कार्यकारी मंडळाचे सदस्य डॉ. वायाल, डॉ. नितीन गुल्हाने, डॉ. शिंदे यांनी सहभाग घेतला होता. प्राध्यापक पदाच्या या पदोन्नतीमुळे अनेक अभियांत्रिकी महाविद्यालयांना एनबीए आणि नॅकसाठी लाभ मिळू शकतो. सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयातील प्राध्यापकांना तंत्रशिक्षण संचालनालयाकडून ही प्रलंबित प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशी आशा आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in