एटीएम सेंटरची २२ लाखांच्या रक्कमेची चोरी

व्हॅनमधील २२ लाख ४३ हजाराची कॅश चोरी करून पळून गेला
एटीएम सेंटरची २२ लाखांच्या रक्कमेची चोरी
Published on

मुंबई : एटीएम सेंटरची सुमारे २२ लाखांची कॅश चोरी करून पळून गेलेल्या सागर दिलीप सोनावणे या वॉण्टेड आरोपीस समतानगर पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून लवकरच चोरी केलेली कॅश हस्तगत केली जाणार आहे. अटकेनंतर त्याला बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. अटकेच्या भीतीने सागर हा गेल्या दोन महिन्यांपासून पोलिसांना सतत गुंगारा देत होता, अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना यश आले. नायगाव येथे राहणारे राजाराम दशरथ घाडीगावकर हे एका खासगी कंपनीत कामाला आहेत.

ही कंपनी विविध एटीएम मशिनमध्ये कॅश जमा करणे आणि डिपॉझिट करण्याचे काम करते. जुलै महिन्यांच्या तिसऱ्या आठवड्यात राजाराम हे त्यांचे तीन सहकारी अमीतकुमार सिंग, अस्लम शेख आणि कॅशचालक सागर सोनावणे यांच्यासोबत कांदिवलीतील ठाकूर कॉम्प्लेक्स परिसरात कॅश डिपॉझिट तसेच एटीएममध्ये जमा झालेली कॅश काढण्यासाठी गेले होते. यावेळी सागर हा व्हॅनमधील २२ लाख ४३ हजाराची कॅश चोरी करून पळून गेला होता. हा प्रकार नंतर निदर्शनास येताच कंपनीच्या वतीने राजाराम घाडीगावकर यांनी समतानगर पोलिसांत तक्रार केली होती.

logo
marathi.freepressjournal.in