
मुंबई : देशातील सर्वात मोठे वाहतुकीचे नेटवर्क असलेल्या रेल्वेत तीन लाख १२ हजार ३९ कामगारांच्या जागा रिक्त असल्याचे धक्कादायक वास्तव उघड झाले आहे. रेल्वेच्या विविध विभागात मोठ्या प्रमाणावर कामगारांची कमतरता जाणवत आहे. मध्य रेल्वेवर २८,८७६, तर पश्चिम रेल्वेवर ३०,५१५ जागा रिक्त आहेत. या रिक्त जागा तातडीने भरणे गरजेचे आहे.
रेल्वेचा प्रशासकीय विभाग, अत्यावश्यक सेवा विभागात ४ हजार कामगारांची पदे रिक्त आहेत. त्याचा मोठा फटका रेल्वेच्या कार्यप्रणालीवर पडत आहे. रेल्वेचा स्थापत्य अभियांत्रिकी विभाग, रेल्वेच्या पायाभूत सुविधांची देखभाल या विभागात ८० हजार जागा रिक्त आहेत. विद्युत विभागात तातडीने ३५ हजार जणांची गरज आहे, तर मॅकेनिकल विभाग हा रेल्वेचा कणा आहे. कारण रेल्वे वाहतूक चालण्यासाठी देखभालीचे काम महत्त्वाचे आहे. या विभागात ६० हजार जागा रिक्त आहेत.
भारतीय रेल्वेतील मनुष्यबळाची कमतरता दूर करण्यासाठी सर्वंकष धोरण आणणे गरजेचे आहे. तातडीने भरती करून प्रशिक्षण देऊन विविध विभागात त्यांना नियुक्त करायला पाहिजे, असे भारतीय रेल्वेच्या कामगार संघटनेच्या नेत्याने सांगितले.