
मुंबई : गिरगाव येथे राहणाऱ्या एका मेटल व्यावसायिकाच्या घरी घरफोडी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. घरात कोणीही नसल्याची संधी साधून अज्ञात चोरट्यांनी सुमारे तेरा लाखांचा मुद्देमाल पळवून नेला. त्यात त्यांच्या मुलीच्या लग्नाच्या दागिन्यांचा समावेश आहे. याप्रकरणी व्ही. पी रोड पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.
शांतीलाल मांगीलाल जैन हे गिरगाव येथील माधवबाग मंदिरासमोरील चंदावाडीमध्ये राहतात. त्यांचा मेटलचा व्यवसाय असून, तिथेच त्यांचे एक दुकान आहे. त्यांच्या मुलीचा साखरपुडा झाला असून, २८ नोव्हेंबर रोजी तिचे लग्न आहे. त्यासाठी त्यांनी काही सोन्याचे दागिने बनविले होते. ते दागिने त्यांनी त्यांच्या घरातील कपाटात ठेवले होते. मंगळवारी १९ सप्टेंबरला दुपारी तीन वाजता ते त्यांच्या कुटुंबीयांसोबत एका धार्मिक कार्यक्रमासाठी गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर ते सर्वजण सायंकाळी सात वाजता घरी आले होते. यावेळी त्यांना त्यांच्या घरी घरफोडी झाल्याचे दिसून आले.