
कोरोनामुळे दोन वर्षें गणेशोत्सव साजरा करण्यावर बंधने होती; मात्र यंदा गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा करता येणार असून, यावर्षी गणेशमूर्तींच्या उंचीचाही प्रश्न मिटलेला आहे; मात्र पीओपीच्या गणेशमूर्ती बाबत पालिका लवकरच नियमावली जाहीर करणार आहे. दरम्यान, सोमवारी गणेशोत्सव समन्वय समितीसोबतच्या झालेल्या बैठकीत पालिका आयुक्त प्रशासक इक्बालसिंह चहल यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती शिवसेना आमदार अजय चौधरी यांनी दिली.
मुंबईत गणेशोत्सवाची आनंद वेगळाच असतो. लाडक्या गणराचे आगमन दोन महिन्यांवर असून आतापासून गणेशभक्तांमध्ये गणेशोत्सव साजरा करण्याची लगबग सुरू झाली आहे; मात्र केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने मे २०२० मध्ये ‘पीओपी’च्या मूर्तींवर बंदी घालण्याबाबत मार्गदर्शक सूचना जारी केलेल्या असल्यामुळे पर्यावरणपूरक आणि शाडूच्या मातीची मूर्ती बनवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मुंबईत १२ हजार सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे व दोन लाख घरगुती मूर्तींपैकी २० टक्के गणेश मंडळे व ६० टक्के घरगुती मूर्ती दोन वर्षांपासून टप्प्याटप्प्याने शाडू किंवा कागदीला प्राधान्य देत असल्याचे गणेशोत्सव समितीचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर समन्वय समितीने यावर्षी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्याची परवानगी देण्याच्या मागणीचे पत्रही याआधी आयुक्तांना दिले आहे.