
बॉलीवूड अभिनेता सलमान खान व त्याचे लेखक वडिल सलीम खान यांना एका पत्राद्वारे आलेल्या जिवे मारण्याची धमकीप्रकरणी मुंबई पोलिसांचे एक विशेष पथक दिल्लीला रवाना झाले आहे. या पथकाने दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या गॅगस्टर लॉरेन्स बिष्णोईची कसून चौकशी केली होती.
या चौकशीचा तपशील समजू शकला नाही. मात्र या धमकीप्रकरणी काही महत्त्वाची माहिती पोलिसांना मिळाल्याचे बोलले जाते. सलीम खान हे लेखक असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत वांद्रे येथील बॅण्डस्टॅण्ड, बी. जे रोडवरील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये राहतात. रविवारी सकाळी ते नेहमीप्रमाणे वॉक करण्यासाठी बॅण्डस्टॅण्ड प्रॉमिनेड परिसरात गेले होते. वॉक आणि व्यायाम केल्यानंतर ते नेहमीच्या एकाच बेंचवर बसले होते. तिथे त्यांना एक पत्र सापडले. त्यात त्यांना उद्देशाने एका अज्ञात व्यक्तीने सलीम खान, सलमान खान बहोत जल्दी आपका मुसेवाला होगा. केजीबीएलबी असे लिहिले होते. या पत्रात सलीम खान आणि सलमान खान यांना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली होती. ते पत्र तिथे कोणी ठेवले याबाबत खुलासा होऊ शकला नाही.
दरम्यान या घटनेनंतर त्यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात धााव घेऊन तिथे उपस्थित पोलिसांना घडलेली माहिती दिली. त्यांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा नोंदविला होता. या धमकीच्या पत्राची पोलीस आयुक्तांनी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेला संमातर तपास करण्याचे आदेश दिले होते. हा तपास हाती येताच गुन्हे शाखेचे एक विशेष पथक दिल्लीला गेले होते. या पथकाने दिल्ली पोलिसांच्या ताब्यात असलेल्या लॉरेन्स बिष्णोईची कसून चौकशी केली. गायक सिद्धू मुसेवाला हत्येत त्याचा सहभाग असल्याचा दिल्ली पोलिसांचा संशय आहे.