
मुंबई : क्रेडिटवर घेतलेल्या सुमारे ७० लाख रुपयांच्या दागिन्यांचा अपहार करुन एका ज्वेलर्स व्यापाऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना एल. टी मार्ग पोलिसांनी अटक केली आहे. टेकी निर्मलकुमार व्यकटरमना रामा ब्रम्हानंदचारी, सत्यनारायण ऊर्फ विनू डी रामनारायण दिक्षीत आणि सौम्या चंद्रशेखरराव कोडा अशी या तिघांची नावे आहेत. या कारवाईत पोलिसांनी ४७ लाख रुपयांचे ८१५ ग्रॅम वजनाची तीन सोन्याची लगड, विविध दागिने जप्त केले आहेत. अटकेनंतर या तिघांनाही लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. सुमीत सुशांत रॉय हे भाईंदर येथे राहत असून, त्यांचा होलसेलमध्ये सोन्याचे दागिने विक्रीचा व्यवसाय आहे. मे २०२३ रोजी त्यांना आंधप्रदेशच्या विशाखापट्टणम शहरातील एमडीएच ज्वेल्स कंपनीचे मालक विनू डी यांनी संपर्क साधून त्यांच्याकडे काही दागिन्यांची मागणी केली होती. त्यामुळे त्यांनी त्याला काही सोन्याचे दागिने पाठवून दिले होते. त्यानेही वेळेस पेमेंट करून त्यांचा विश्वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. काही दिवसांनी विनू डीने त्यांना संपर्क साधून त्यांच्याकडे जास्त दागिन्यांची मागणी केली होती. त्यांच्याकडे काही पार्टी असून त्यांना जास्त दागिन्यांची गरज आहे. त्यामुळे त्यांना क्रेडिटवर १२०० ग्रॅम वजनाचे सत्तर लाख रुपयांचे दागिने पाठविण्यात आले होते. मात्र दिलेल्या मुदतीत त्यांनी पेमेंट केले नाही. फसवणुकीचा प्रकार निदर्शनास येताच त्यांनी विनूसह इतर आरोपीविरुद्ध एल. टी मार्ग पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच एल. टी मार्ग पोलिसांनी आंधप्रदेशात जाऊन सत्यनारायण आणि सौम्या याएमडीएच ज्वेलर्सच्या मालकांना अटक केली.