
नवी मुंबई : बेलापूर-शहाबाज गावठाण परिसरातील चार मजली अनधिकृत इमारत शनिवारी पहाटे पावणेपाचच्या सुमारास कोसळून झालेल्या दुर्घटनेत तीन रहिवाशांचा मृत्यू झाला असून दोघे जखमी झाले आहेत. जखमींवर वाशीच्या महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दुर्घटनेबाबत जागामालक शरद वाघमारे आणि विकासक महेश कुंभार यांच्या विरोधात एमआरटीपी कायद्यांतर्गत नवी मुंबई मनपाने एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
शहाबाज गाव, सेक्टर १९, बेलापूर येथे शनिवारी पहाटे इंदिरा निवास ही तळमजला अधिक ४ मजली इमारत सकाळी कोसळली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नवी मुंबई महानगरपालिकेचे अग्निशमन दल घटनास्थळी दाखल होऊन त्यांनी बचावकार्याला सुरुवात केली. त्याचबरोबर एनडीआरएफच्या टीमलाही घटनास्थळी पाचारण केले. या इमारतीत ३ दुकाने व १७ सदनिका होत्या.
या दुर्घटनेपूर्वी पहाटे चार वाजता या इमारतीसमोर रस्त्यावरून जाणाऱ्या रिक्षाचालकाला इंदिरा निवास इमारतीचे फ्लास्टर कोसळताना व कॉलमला तडे जाताना दिसले. त्यामुळे रिक्षावाल्याने इमारतीच्या तळमजल्यावरील मोहम्मद अन्सारी यांचा दरवाजा ठोठावून त्यांना याची माहिती दिली. त्यानंतर अन्सारी यांनी रहिवाशांना तत्काळ फोन करून त्यांना बाहेर पडण्यास सांगितले. त्यामुळेच या इमारतीतील ५० जण बाहेर पडले. पण, इमारतीतील सर्व रहिवाशी बाहेर पडण्यापूर्वीच इमारत कोसळली. त्यामुळे या दुर्घटनेनंतर ढिगाऱ्याखाली तिघांचा बळी गेला, तर दोन जखमींवर महापालिका रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
यंदाच्या पावसाळ्यातील दुसरी दुर्घटना
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे २० जुलैला वाशी सेक्टर-१२ येथील भूखंड क्रमांक १३३ वर धोकादायक चार मजली इमारत कोसळण्याची घटना रात्री पावणेदहाच्या सुमारास घडली होती. सदर इमारत धोकादायक जाहीर झाल्याने सर्व रहिवासी इतरत्र राहत होते. त्यामुळे या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.