
मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ३५० व्या राज्यभिषेक वर्षानिमित्त ३५० गडकिल्ल्यांवर स्वच्छता मोहिम राबविणे कौतुकास्पद आहे. स्वच्छतेची लोक चळवळ आजपासून सुरू झाली असून, जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी गड किल्ल्यांसाठी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
शिवडी किल्ला येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त, 'स्वच्छता हीच सेवा' या उपक्रमांतर्गत गड -किल्ल्यांची राज्यव्यापी स्वच्छता मोहीमेचा शुभारंभ उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी केला. यावेळी ते बोलत होते.
कौशल्य विकास विभागांतर्गत राज्यातील ४१८ शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय. टी. आय.) यांच्याद्वारे परिसर स्वच्छता आणि गड किल्ल्यांची स्वच्छता मोहिम राबविण्यात येत आहे. दीड लाख विद्यार्थी या मोहिमेत सहभागी झाले आहेत.
शिवछत्रपतींच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांना या उपक्रमाद्वारे अनोखी मानवंदना देण्यात येत आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत असलेल्या ४०० आय. टी. आय. संस्थांनी परिसर स्वच्छता व गड किल्ल्यांची स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला असल्याचे मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
गड किल्ले आणि जलदुर्ग राज्याचे खरे वैभव
देशाच्या भौतिक प्रगतीसाठी स्वच्छ व स्वस्थ भारत असणे गरजेचे आहे. राज्याचे खरे वैभव हे गड किल्ले आणि जलदुर्ग आहेत. त्यांचे संवर्धन व स्वच्छता स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शासन करित आहे. गड किल्ल्यांचे संवर्धन आणि स्वच्छतेसाठी जिल्हा वार्षिक योजनेतून दरवर्षी तीन टक्के निधी उपलब्ध करून दिला जाणार असून, राज्याचे वैभव जतन करण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले.