
मुंबईत (Mumbai) बीकेसी येथे विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका कारने अन्य एका कारला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात एका साडेतीन वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला असून अन्य दोन व्यक्ती गंभीर जखमी झाल्या आहेत. याप्रकरणी विश्वास अट्टावर या कारचालकाला पोलिसांनी अटक केली आहे. तो गाडी चालवताना मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
आरोपी चालकाने मंगळवारी संध्याकाळी ५ वाजण्याच्या सुमारास आधी बीकेसी पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या ट्रॅफिक सिग्नलजवळ एक ऑटोरिक्षासह पादचाऱ्याला धडक दिली. त्यानंतर तिथून वेगाने पळ काढताना त्याने हॉटेल ट्रायडन्ट येथील मार्गावरून विरुद्ध दिशेने जात समोरून येणाऱ्या एका कारला धडक दिली. या भीषण अपघातात स्वाती चौधरी या साडेतीन वर्षाच्या मुलीचा जागीच मृत्यू झाला. तर तिचे काका ओम चौधरी (२५) आणि त्यांचे मित्र विनोद यादव (४६) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत. दोघांनाही गुरु नानक रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी गाडीचालकाला ताब्यात घेतले असून त्याला न्यायालयापुढे हजर केले असता न्यायालयाने ५० हजाराच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन मंजूर केला.