
प्रवासादरम्यान मग ते रिक्षा-टॅक्सी असो, अथवा बस-रेल्वे कायम सुट्ट्या पैशांची मागणी करण्यात येते; मात्र यावर एसटी महामंडळाकडून तोडगा काढण्यात आला आहे. यापुढे एसटीतून प्रवास करताना प्रवाशांना तिकिटासाठी सुट्ट्या पैशांची चिंता करण्याची गरज पडणार नाही. प्रवाशांना ‘डिजिटल’ प्रणालीद्वारे तिकीट खरेदी करता येणार आहे. यासाठी पाच हजार अँड्रॉइड तिकीट मशिन्स प्रशासनाने नव्याने सेवेत दाखल केल्या आहेत. नव्या मशीनमुळे प्रवाशांना प्रवासादरम्यान रोख पैशांऐवजी यूपीआय, क्यूआर कोड, आदी डिजिटल पेमेंटचा वापर करत तिकीट काढता येणार असल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी दिली आहे.
एसटी महामंडळाच्या मुख्यालयातील सभागृहात एका समारंभात महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांच्या हस्ते या मशिन्सचा शुभारंभ करण्यात आला. सध्या डिजिटल युग सुरू आहे. त्यामुळे रोखीने व्यवहार होण्याचे प्रमाण खूप कमी झाले आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून डिजिटल व्यवहाराला चालना देणे आवश्यक असल्याचा कायम उल्लेख केला जातो. त्या दृष्टिकोनातून एसटी महामंडळाने एक पाऊल पुढे टाकत प्रवासादरम्यान प्रवाशांना बसमध्ये तिकीट काढण्यासाठी यूपीआय, क्यूआर कोड इत्यादी डिजिटल पेमेंटची सुविधा देणाऱ्या पाच हजार अँड्रॉइड आधारित मशिन्सचा समावेश केला आहे. मे. ईबिक्सकॅश मोबिलिटी सॉफ्टवेअर इंडिया लि. मे. पाईनलॅब व स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्या सहकार्याने एसटी महामंडळास पाच हजार नवीन अँड्रॉइड आधारित डिजिटलची सुविधा असणारी तिकीट मशिन्स मिळाल्या आहेत.