४३ लाखांच्या फसवणूकीप्रकरणी व्यावसायिकासह दोघांना अटक

या पेमेंटविषयी ते सचिनसह अमीतकडे वारंवार विचारणा करत होते. मात्र ते दोघेही काही दिवसांची मुदत मागून त्यांना टाळत होते.
४३ लाखांच्या फसवणूकीप्रकरणी व्यावसायिकासह दोघांना अटक

मुंबई : ४३ लाख रुपयांच्या फसवणुकीप्रकरणी एका व्यावसायिकासह दोघांना बांगुरनगर पोलिसांनी अटक केली. सचिनकुमार शांतीकुमार गुप्ता ऊर्फ सचिन आहुजा आणि त्याचा सहकारी अमीत हेमाकांत मिश्रा अशी या दोघांची नावे आहेत. इलेक्ट्रिक साहित्य घेऊन पेमेंट न देता एका व्यावसायिकाची फसवणुक केल्याचा या दोघांवर आरोप आहे. याच गुन्ह्यांत त्यांना बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. गौरव प्रविण झुनझुनवाला हे पवई पसिरात राहत असून ते इलेक्ट्रीक व्यावसायिक आहे. साकिनाका येथे त्यांचे एक शॉप आणि गोदाम आहे. गेल्या वर्षी त्यांची सचिनकुमारशी ओळख झाली होती. तो त्यांच्याशी व्यवसायाशी संबंधित होता. त्यामुळे त्यांच्यात इलेक्ट्रीक वायरसह इतर साहित्याची खरेदी-विक्रीचा व्यवहार सुरु झाला होता. प्रत्येक ऑर्डरनंतर सचिनकुमारने त्यांचे पेमेंट करुन त्यांचा विश्‍वास संपादन करण्याचा प्रयत्न केला होता. याच दरम्यान सचिनकुमारसह अमीतने त्यांना त्यांची काही बिल्डरसोबत चांगली ओळख असून त्यांना भविष्यात मोठी ऑर्डर मिळवून देतो असे सांगितले होते. त्यानंतर त्यांनी लक्ष्मी इलेक्ट्रिकल्स आणि राधाकृष्ण इंटरप्रायजेस या दोन दुकानासाठी त्यांना १ कोटी ३६ लाख रुपयांची दोन मोठ्या ऑर्डर मिळवून दिल्या होत्या. ठरल्याप्रमाणे त्यांनी त्या ऑर्डरची डिलीव्हरी केली होती. त्यापैकी ९४ लाख रुपयांचे पेमेंट त्यांना देण्यात आले होते. मात्र ४२ लाख ८५ हजार रुपयांचे पेमेंट येणे बाकी होते. या पेमेंटविषयी ते सचिनसह अमीतकडे वारंवार विचारणा करत होते. मात्र ते दोघेही काही दिवसांची मुदत मागून त्यांना टाळत होते. काही दिवसांनी त्यांनी त्यांना काही धनादेश दिले होते. मात्र ते धनादेश बँकेत न वटता परत आले होते. चेक बाऊन्स झाल्याचे सांगितल्यानंतरही त्यांनी पेमेंट केले नाही. हा प्रकार संशयास्पद वाटताच त्यांनी त्यांच्या दुकानासह कार्यालयात भेट दिली होती. यावेळी त्यांना त्यांचे दुकानासह कार्यालय बंद असल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांचा त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. या दोघांकडून फसवणुक झाल्याचे निदर्शनास येताच त्यांनी बांगुरनगर पोलिसांत तक्रार केली होती. या तक्रारीनंतर सचिन आहुजा आणि अमीत मिश्राविरुद्ध पोलिसांनी अपहारासह फसवणुकीचा गुन्हा नोंदविला होता. गुन्हा दाखल होताच ते दोघेही पळून गेले होते. अखेर चार महिन्यानंतर या दोन्ही आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. याच गुन्ह्यांत ते दोघेही पोलीस कोठडीत असून त्यांची पोलिसांकडून चौकशी सुरु आहे. या दोघांनी अशाच प्रकारे इतर काही गुन्हे केले आहेत का याचा पोलीस तपास करत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in