मुंबई आणि उपनगरात दोन दिवस मान्सूनपूर्व सरी कोसळणार

मुंबई आणि उपनगरात दोन दिवस मान्सूनपूर्व सरी कोसळणार

काड्याने हैराण झालेल्या मुंबईकरांना दोन दिवसांत दिलासा मिळणार आहे. मुंबई आणि उपनगरात दोन दिवस मान्सूनपूर्व सरी कोसळणार असल्याने वातावरणात गारवा निर्माण होईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. रविवारी पहाटे मुंबई आणि उपनगरात काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या.

अरबी समुद्रात दाखल झालेला मान्सून पुढील दोन ते तीन दिवसांत केरळात धडकणार आहे. तर ५ जूनला कोकणात आणि ७ जूनपर्यंत मुंबईत दाखल होण्याची शक्यता आहे. एरवी मान्सून मुंबईत १० जूनपर्यंत दाखल होतो. यंदा मात्र आतापर्यंत मान्सूनच्या प्रवासात कोणतेच अडथळे नसल्याने तो लवकर दाखल होईल, असा अंदाज आहे. राज्यात ३ ते ९ जूनदरम्यान मान्सूनचे राज्यात आगमन होईल आणि १० ते १६ जूनपर्यंत मुसळधार पाऊस बरसेल, असा इशाराही हवामान विभागाने दिला आहे. हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून नियोजित वेळेच्या एक आठवडाअगोदर १५ मे रोजी अंदमान निकोबार बेटांवर पोहोचला. आता केरळमध्ये २७ मेपर्यंत आणि त्यानंतर मुंबईत ६ ते ७ जूनपर्यंत पोहोचण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील काही भागात दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत आहे. यामुळे शेतकरी पेरणीच्या तयारीला लागला आहे. मान्सूनपूर्व पाऊस असल्याने कदाचित हा पाऊस थांबल्यानंतर पुढचे काही दिवस पाऊस नाही लागल्यास दुबार पेरणीचे संकट ओढवू शकते. यासाठी कृषिमंत्री दादा भुसे यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई न करण्याचे आवाहन केले आहे.

Related Stories

No stories found.
marathi.freepressjournal.in