
मुंबई : चोरीनंतर पळून गेलेल्या दोन नोकरांना अटक करण्यात कुरार आणि कांदिवली पोलिसांना यश आले आहे. सुनील लोचन गुप्ता आणि मिथीरोष भक्तीराम ऊर्फ करणकुमार अशी या दोघांची नावे आहेत. याच गुन्ह्यांत ते दोघेही सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिनेश रामकुमार जयस्वाल यांचे कांदिवलीत कांदा-बटाटा विक्रीचा व्यवसाय असून त्यांच्याकडे सुनील गेल्या सहा वर्षांपासून कामाला होता. १५ जानेवारी रोजी सुनीलने जमा झालेले ७१ हजार रुपये घेऊन पलायन केले होते. कांदिवली पोलिसांत तक्रार दिल्यानंतर सुनील पोलिसांना गुंगारा देत होता. अखेर कांदिवली पोलिसांनी त्याला अटक केली. दुसऱ्या घटनेत, सुशीलकुमार अग्रवाल यांच्या घरात नोकर म्हणून काम करणाऱ्या करणकुमारला काही कारणास्तव नोकरीवरून काढून टाकण्यात आले होते. त्यामुळे त्यांच्या घरात चोरी करून करणकुमारने पलायन केले होते. अखेर कुरार पोलिसांनी त्याला तीन महिन्यांनंतर अटक केली.