सेंच्युरी रेयॉन कंपनीत भीषण ब्लास्ट उल्हासनगरमध्ये दोन कामगारांचा मृत्यू ; दोन बेपत्ता

कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सुरक्षा यंत्रणा आणि उपाययोजना लागू केल्या आहेत
सेंच्युरी रेयॉन कंपनीत भीषण ब्लास्ट उल्हासनगरमध्ये दोन कामगारांचा मृत्यू ; दोन बेपत्ता
Published on

उल्हासनगर : सर्वत्र गणेशोत्सवाची धूम सुरू असताना उल्हासनगरमध्ये एक भीषण दुर्घटना घडली आहे. उल्हासनगर येथील सेंच्युरी कंपनीत भीषण स्फोट झाला आहे. या घटनेत दोन कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. दोन जण बेपत्ता असून सहा कामगार जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.

उल्हासनगर शहरात सेंच्युरी रेयॉन कंपनी आहे. या कंपनीच्या सीएस २ डिपार्टमेंटमध्ये शनिवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास भीषण स्फोट झाला. हा स्फोट इतका भीषण होता की, शहरातील तानाजीनगर, शहाड गावठाण, गुलशन नगर, शहाड फाटक, धोबीघाट, शिवनेरी नगर परिसरातील घरांना हादरे बसले. या भीषण स्फोटात आतापर्यंत शैलेश यादव आणि राजेश श्रीवास्तव या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. तसेच सागर झाल्टे, पंडित मोरे, प्रकाश निकम, हंसराज सरोज, अमित भरनुके, मोहम्मद अरमान हे कामगार गंभीर जखमी आहेत, तर पवन यादव आणि अनंत डिंगोरे हे दोन जण अद्याप देखील बेपत्ता आहेत.

घटनेची माहिती मिळताच स्थानिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आहे. ऐन गणेशोत्सवात कामगारांवर काळाने घाला घातल्याने परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार, आमदार कुमार आयलानी, पप्पू कलानी, ठाकरे गटाचे धनंजय बोडारे, शिंदे गटाचे राजेंद्र चौधरी, अरुण आशान, विकी भुल्लर यांच्यासह इतर नेत्यांनी घटनास्थळी भेट दिली.

टँकरमध्ये गॅस भरण्याआधीच स्फोट

या संदर्भात सेंच्युरी रेयॉन कंपनीचे जनसंपर्क अधिकारी मेहुल लालका यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी ११.३० च्या सुमारास कंपनीमध्ये एमएच ०४ जीसी २४८२ हा टँकर बाहेरून आला होता, त्यात सीएस २ (कार्बनडाय सल्फर) हे रसायन भरण्यात येणार होते. मात्र, टँकरची तपासणी सुरू असतानाच स्फोट झाला. या दुर्घटनेत २ कामगार मृत झाले असून ४ जण जखमी झाले आहेत. जखमींना सेंच्युरी रेयॉनच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती स्थिर आहे. कंपनीने सुरक्षिततेच्या दृष्टीने सर्व सुरक्षा यंत्रणा आणि उपाययोजना लागू केल्या आहेत.

logo
marathi.freepressjournal.in