
आजचा दिवस हा रिफायनरीला विरोध करणाऱ्या आंदोलनावरून चांगलाच गाजला. आधी नानार येथे हा रिफायनरी प्रकल्प बांधण्यात येणार होता. मात्र, आधीची शिवसेना आणि स्थानिक नागरिकांच्या विरोधानंतर हा प्रकल्प थांबवण्यात आला. यानंतर त्यावेळी सत्तेत असलेल्या ठाकरे सरकारने नानार येथे होणार हा प्रकल्प बारसू - सोलगावात उभारण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला होता. त्यानंतर आता आज झालेल्या आंदोलनानंतर ठाकरे सरकारने राज्य सरकारवर टीका करण्यास सुरुवात केली.
यावरून शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. "उद्धव ठाकरे जर आज मुख्यमंत्री असते तर त्यांनी या प्रकल्पाला विरोध केला नसता. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्याने ठाकरे गट बारसू प्रकल्पाला विरोध करत आहेत." असा आरोप त्यांनी यावेळी केला. तसेच, जानेवारी २०२२मध्ये उद्धव ठाकरेंनी केंद्राला यासंदर्भात पात्र लिहिले होते, असेदेखील सांगितले. बारसू येथील जमीन उद्धव ठाकरेंनीच सुचवल्याचा आरोप उदय सामंत यांनी केला. मंत्री उदय सामंत म्हणाले की, "उद्धव ठाकरेंच्या पत्रामुळे सर्वेक्षण सुरू झाले असून त्यांनी मताचे राजकारण करु नये. राजकीय पोळी भाजण्यासाठी राजकारण सुरू असून याला दुट्टपीपणा म्हणतात," असा आरोप त्यांनी केला.