गावपातळीवर तिन्ही पक्षांना एकत्र यावे लागेल ; मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आवाहन

महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये पदाधिकाऱ्यांसोबत बोलताना उद्धव ठाकरे यांनी सर्वांना आवाहन करत विरोधकांवर टीका केली
गावपातळीवर तिन्ही पक्षांना एकत्र यावे लागेल ; मविआच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचे आवाहन

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. नुकतेच महाविकास आघाडीच्या सर्व बड्या नेत्यांसह त्यांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी सर्वांना आवाहन केले की, गावपातळीवर तिन्ही पक्षांना एकत्र यावे लागेल. तसेच यावेळी त्यांनी भाजपसह शिंदे गटावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, "मी घरी बसून सरकार चालवले. मी जे घरी बसून करू शकलो ते तुम्ही सुरत-गुवाहाटीला जावून करू शकलेले नाही." असा टोला त्यांनी शिंदे गटाला लगावला.

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणाले की, "आपण सर्वांनी एकत्र आले पाहिजे, नाहीतर देशामध्ये हुकूमशाहीची राज्य येईल. मी नसलो तरी चालेल पण या देशातील लोकशाही टिकली पाहीजे. क्रांतिकारकांनी जे बलीदान दिले ते नरेंद्र मोदींसाठी नाही, तर देशासाठी दिले." असा टोला भाजपला लगावला. तसेच, ते पुढे म्हणाले की, "भाजपमध्ये सामील व्हा नाहीतर तुरुंगात जा, असा काळ आला आहे. त्यांना आता दिशा दाखवण्याची वेळ आली असून ही लढाई महाराष्ट्रात आपण लढत आहोत."

पुढे उद्धव ठाकरे म्हणाले की, "लोकशाहीच्या ४ पैकी ३ स्तंभाची वाट लावून ठेवली आहे. आता अपेक्षा फक्त सर्वोच्च न्यायालयाकडून आहे. पत्रकारांच्या हातात कलम असावे, पण आजकाल काही पत्रकारांच्या हातात कमळ दिसते आहे. न्यायदेवता लोकशाहीचे वस्त्रहरण होऊ देणार नाही." सत्तासंघरावरील सुरू असलेल्या सुनावणीवरून त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तसेच, "कोणाच्या बोलण्यावरून आपली भूमिका घ्यायची, एवढी लाचारी घेणारा मी नसून हेच सत्य आहे. 'भाजप अन्याय करते,' अशी तक्रार घेऊन येणारे सध्याचे मुख्यमंत्रीच होते आणि त्यांच्यासोबत जाताना 'काॅंग्रेस राष्ट्रवादी अन्याय करते' हे सांगणारेही तेच आहेत." असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना टोला लगावला.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in