
आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाल्यानंतर, 'गेल्या काही दिवसांमध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेले शेतकऱ्यांचे नुकसान हे सरकार कसे भरून काढणार? यासाठी राज्य सरकार काय पाऊले उचलणार?' असे प्रश्न विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याकडून विचारण्यात आले. त्यांनी मागणी केली की, "आज प्रश्नोत्तराचा भाग वगळून केवळ अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी" असे म्हणाले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माहिती मागवली असून लवकरच त्यांना मदत केली जाईल, असे आश्वासन दिले आहे.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी, "अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी," अशी आक्रमक मागणी केली. काँग्रेस नेते नाना पटोलेंनीदेखील, "राज्यात अवकाळी पावसामुळे बळीराजासमोर पुन्हा गंभीर स्थिती निर्माण झाली आहे. आज इतर सर्व मुद्दे बाजुला करुन केवळ शेतकऱ्यांच्या मुद्द्यांवर चर्चा करावी," अशी मागणी केली. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, "राज्यात किती शेतकऱ्यांचे नुकसान झाले, याची माहिती मागवली आहे. तसेच, पंचनाम्यानंतर तत्काळ मदतीचे प्रस्तावही मागवलेले आहेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पूर्ण नुकसानभरपाई दिली जाणार आहे," अशी ग्वाही त्यांनी दिली.