
शिवडीच्या क्षयरोग रुग्णालयात ३ ते १२ वर्ष वयोगटातील मुलांसाठी लहान मुलांचा विभाग (पीडियाट्रिक वॉर्ड) तयार करण्यात येणार आहे. यात २० बेड्स असून येत्या महिन्याभरात हा वाढ लहान मुलांसाठी सज्ज असेल, अशी माहिती महापालिकेकडून देण्यात आली. मात्र आता कोणताही बालक्षयरोग तज्ज्ञ जाहिरात प्रक्रियेला प्रतिसाद देत नसल्याने आता मुंबई किंवा मुंबई बाहेरून डॉक्टर मिळविण्यासाठी विविध कल्पनांचा वापर करण्यात येत आहे. आता येणाऱ्या डॉक्टरांना पालिकेच्या निवासी वसतिगृहात राहण्यासाठी जागा देण्यात येणार असून अजून काही कोणते पर्याय या डॉक्टरांना देता येतील, याबाबत विचारविनिमय सुरू आहे.
जागतिक क्षयरोगाच्या दिनानिमित्त त्याचे उद्घाटन करण्याची पालिकेची तयारी होती. पण, लहान मुलांसाठी लागणारे बालरोगतज्ज्ञच अजूनपर्यंत पालिकेला उपलब्ध झाले नसल्याकारणाने फक्त मोठ्या मुलांवर उपचार केले जातात.
सध्या रुग्णालयात १६ वर्षांवरील टीबी रुग्णांवर दाखल करून उपचार केले जातात. मात्र, १ ते १५ वर्षापर्यंतच्या मुलांवर उपचार करण्यासाठी बालरोगतज्ज्ञांची गरज मोठ्या प्रमाणात भासते. सध्या बालरोगतज्ज्ञच उपलब्ध नसल्याने आजही रुग्णांना दुसऱ्या रुग्णालयात उपचारांसाठी पाठवले जाते. दरम्यान, २०२० पासूनच या रुग्णालयात बालरोगतज्ज्ञ उपलब्ध नाही. बालरुग्णांना हाताळण्याची एक वेगळी पद्धत असते. साधी सलाईन लावण्यासाठी सराव केलेले बालरोगतज्ज्ञ लागतात. शिवाय, त्यांना दिले जाणारे डोसही वेगळे असतात. त्यामुळे, रुग्णालयात पिडीयाट्रिक वॉर्ड बांधला गेला. मात्र, त्यासाठी २४ तास बालरोगतज्ज्ञ लागणार असून यासंदर्भातील जाहिराती प्रसिद्ध केल्या गेल्या आहेत.
जाहिरातीलाही प्रतिसाद नाही
दरम्यान, सर्जरी विभाग सुरू लवकरच होणार असून त्यासाठी आवश्यक असलेल्या भूलतज्ज्ञांची नेमणूक झाल्याचे त्यांनी सांगितले. या पदासाठी आवश्यक असलेले नियम आणि मोठ्या पगाराची पूर्तता करण्यात आली आहे. दरम्यान, यापूर्वी आलेले दोन इच्छूक उमेदवार हे बालक्षयरोग तज्ज्ञ होते. मात्र, नंतर त्यांनी अनिच्छा दर्शवल्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. या बालक्षयरोग कक्षासाठी दोन तज्ज्ञ वैद्यकीय सल्लागार अर्थात बालरोग तज्ज्ञांची नेमणूक करण्यासाठी पुन्हा अर्ज प्रक्रियेबाबतचा तपशील व संबंधित माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ही २५ मे होती. त्यावेळी अर्ज करा, असे आवाहन महापालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ मंगला गोमारे यांनी केले मात्र त्या जाहिरातीला देखील प्रतिसाद मिळत नसल्याचे एका अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.