
मुंबई : कोट्यवधी रुपये खर्चून मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी मास्टिक कुकरचा वापर करण्यात येणार आहे. पालिकेच्या २४ वॉर्डात या मशीन उपलब्ध करण्यात आल्या आहेत. दरम्यान, खड्डा बुजवल्यानंतर सहा तासांत त्या रस्त्यावरून वाहतूक खुली करण्यात येते.
मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी मुंबई महापालिका दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करते. तरीही दरवर्षी पावसाळ्यात खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण होते आणि मुंबई महापालिकेला टीकेचा सामना करावा लागतो. त्यामुळे मुंबईतील रस्ते सिमेंट क्राँकिटचे करण्यात येत असून पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त असतील. मात्र खड्डे बुजवण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येत असून सध्या मास्टिक कुकरचा वापर करण्यात येत आहे. यामुळे खड्डा बुजवल्यानंतर सहा तासांत त्या रस्त्यावरून वाहतूक सुरू होते. पालिकेच्या २४ वॉर्डात या मशीन उपलब्ध केल्याचे मुंबई उपनगराचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी सांगितले.
खड्डे बुजवण्यासाठी पथक !
प्रत्येक विभागाच्या स्तरावर सहायक आयुक्त हे खड्डे बुजवण्यासाठीच्या कामाचे समन्वय अधिकारी (नोडल) म्हणून काम सांभाळत आहेत. दिवसा खड्ड्यांची पाहणी करून रात्रीच्या वेळेत खड्डे बुजवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. विशेष पथके तयार करून खड्डे बुजवण्याची कामे युद्ध पातळीवर करण्यात येत आहेत. रस्ते अभियंत्यांसोबत सर्व पथके पावसाळ्याच्या काळात प्रत्यक्ष क्षेत्रावर (ऑनफिल्ड) कार्यरत राहणार आहेत व याची जबाबदारी सहायक आयुक्तांवर सोपवण्यात आली आहे. या दुय्यम अभियंत्यांच्या देखरेखीखाली मास्टिक रॅपिड हार्डनिंग काँक्रिट पद्धतीचा वापर करून खड्डे बुजवण्यात येणार आहेत.