
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका लसीकरणावर भर देत आहे. त्यामुळेच पालिकेने शाळांमध्ये लसीकरण शिबिरे आयोजित करण्याचे पाऊल उचलले असून पालिकेने त्यांच्या सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांकडून आतापर्यंत लसीकरण झालेल्या तसेच शिल्लक असलेल्या मुलांचा अहवाल मागवला आहे.
गेल्या काही आठवड्यांपासून मुंबईत कोरोनाची चौथी लाट वाढत असून ओमायक्रॉनचे रुग्णही वाढत आहेत. बीए ४ आणि बीए ५ या उपप्रकारांची प्रकरणेही शहरात आढळून आल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. त्यातच दोन आठवड्यांपूर्वी शाळा सुरू झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा वेगाने फैलाव होण्याची शक्यता आहे. पालिका संचालित शाळांमधील ७५ हजारांपेक्षा अधिक मुले लसीकरणास पात्र आहेत, असे पालिकेच्या अधिकाऱ्याने सांगितले. त्यामुळे या मुलांच्या सुरक्षेसाठी पालिकेने आता लसीकरण मोहीम सुरू करण्याला प्राधान्य दिले आहे.
“पालिका शाळांमध्ये १२ ते १५ वयोगटातील ७५ हजार मुले लसीकरणासाठी पात्र आहेत. सुट्ट्यांमध्ये यांपैकी किती जणांचे लसीकरण झाले, याची माहिती आम्ही शाळांकडून मागवली आहे. सर्व मुख्याध्यापकांकडून पहिला, दुसरा डोस घेतलेल्या तसेच एकही डोस न घेतलेल्यांची यादी आम्ही गोळा करणार असून त्यानंतर लसीकरण शिबिरे आयोजित करण्यात येतील,” असे पालिकेच्या कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी सांगितले. त्याशिवाय जी मुले लसीकरणासाठी इच्छुक नाहीत, त्यांचे तसेच त्यांच्या पालकांचे समुपदेशन करण्यात येईल, असेही डॉ. गोमारे यांनी नमूद केले.
दरम्यान, मुलांना दिली जाणारी कोर्बेवॅक्स ही लस अत्यंत सुरक्षित असून पालकांनी न घाबरता आपल्या पाल्याचे लसीकरण लवकरात लवकर करून घ्यावे, असे आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ. लाका पाटील यांनी केले आहे.
मुंबईत १५ वर्षे वयोगटातील किशोरवयीन मुलांचे लसीकरण जानेवारीमध्ये, तर १२ वर्षे वयोगटातील मुलांचे लसीकरण मार्चमध्ये सुरू झाले. सध्या १५ ते १७ वयोगटातील ३ लाख ८८ हजारांहून अधिक मुलांनी पहिला डोस, तर २ लाख ९० हजारांहून अधिक मुलांनी दुसरा डोसही घेतला आहे. १२ ते १४ वयोगटात १ लाख २५ हजार मुलांनी लसीची पहिली, तर ६० हजार बालकांनी दुसरी मात्रासुद्धा घेतलेली आहे.