
मुंबई : कचरा मुक्त मुंबई यासाठी मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत. कचरामुक्त मुंबईसाठी कचरा वर्गीकरण महत्वाचे असून, सुका कचरा वर्गीकरण केंद्र सुरू करण्यात येणार आहे. कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्यासाठी कचरा वेचक संस्था, बचतगट व सुका कचरा वर्गीकरणाचा अनुभव असलेल्या अशासकीय संस्थांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालिकेच्या एम पूर्व विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.
मुंबईत दररोज ५,५०० मेट्रिक टन कचरा जमा होतो. जमा होणाऱ्या कचऱ्यावर शास्त्रोक्त पद्धतीने डम्पिंग ग्राऊंडवर विल्हेवाट लावली जाते. मुंबई शहर व दोन्ही उपनगरातून जमा होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण योग्य प्रकारे होत नसल्याने प्रत्येक वॉर्डात कचरा वर्गीकरण केंद्र सुरू करण्यात येत आहे. २०३० पर्यंत मुंबई कचरा मुक्तीचे उद्दीष्ट ठेवले असून, सुका कचरा व ओला कचरा असे वर्गीकरण करण्यात येते. तसेच मुंबईतील सोसायटी, इमारतीतील रहिवाशांनी कचरा देताना सुका व ओला कचरा वेगवेगळा करुन देणे गरजेचे आहे. यामुळे कचऱ्यावर प्रक्रिया करणे सोयीस्कर होईल, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाकडून सांगण्यात आले.
कचऱ्याचे प्रमाण शास्त्रोक्त पद्धतीने करण्यासाठी निर्णय
कचऱ्याचे प्रमाण शास्त्रोक्त पद्धतीने कमी करण्यासाठी सुका कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्याचा निर्णय घेतला आहे. चेंबूर पूर्व विभागात सुका कचरा वर्गीकरण केंद्र सुरू करण्यासाठी सामाजिक संस्था, कचरा वेचक संस्था, बचतगट व सुका कचरा वर्गीकरणाचा ३ वर्षांचा अनुभव असलेल्या अशासकीय संस्थांना चेंबूर पूर्व येथे कचरा वर्गीकरण केंद्र उभारण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन पालिकेच्या एम पूर्व विभागातील घनकचरा व्यवस्थापन विभागाने केले आहे.