राजकीय बॅनरपटूंविरोधात कारवाईचे आदर्श हत्यार, मुंबई मनपाच्या मसुदा धोरणात निकषांचा समावेश; खासगी मालमत्तांच्या मालकाबरोबरच ताबेदाराची मुभाही आवश्यक

लोकसभा, विधानसभा तसेच पालिका निवडणुका यांच्या कालावधीत राजकीय बॅनरबाजी, फलकांवर ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने आदर्श निवडणूक आरासंहितेचे निकष आता मुंबई महापालिकेच्या जाहिरात मार्गदर्शक धोरणाच्या मसुद्यात (२०२४) समाविष्ट करण्यात आले आहेत.
Hoarding In Mumbai
राजकीय बॅनरपटूंविरोधात कारवाईचे आदर्श हत्यार
Published on

मुंबई : लोकसभा, विधानसभा तसेच पालिका निवडणुका यांच्या कालावधीत राजकीय बॅनरबाजी, फलकांवर ठोस कारवाई करण्याच्या उद्देशाने आदर्श निवडणूक आरासंहितेचे निकष आता मुंबई महापालिकेच्या जाहिरात मार्गदर्शक धोरणाच्या मसुद्यात (२०२४) समाविष्ट करण्यात आले आहेत.

त्यानुसार, सार्वजनिक ठिकाणांचा वापर प्रचाराचे बॅनर, फलक, घोषणा यांसाठी करता येणार नाहीच, शिवाय खासगी निवासस्थानी उमेदवाराचे जास्तीत जास्त तीन झेंडे लावता येतील. कुणाला एकापेक्षा अधिक पक्ष किंवा उमेदवाराचे झेंडे लावायचे असल्यास अशा प्रत्येक पक्षाचा एकच झेंडा लावता येईल.

खासगी वाहनावर जास्तीत जास्त एक फूट बाय दीड फूट आकाराचा एकच झेंडा लावता येईल. त्याची काठी तीन फुटांपेक्षा जास्त उंच नसेल. याचा रस्त्यावरील इतर वाहनांना उपद्रव होता कामा नये. वाहनावर योग्य आकाराचे एक किंवा दोन लहान स्टीकर मात्र लावता येतील.

महत्त्वाचे म्हणजे रोड शो करताना वाहनावर कोणतेही बॅनर लावता येणार नाही. तर, जास्तीत जास्त सहा फूट बाय चार फूट आकाराचे एकच बॅनर हातात पकडून नेता येईल. खासगी जागा मालकाने किंवा ताबेदाराने स्वेच्छेने परवानगी दिल्याशिवाय तेथे झेंडा-बॅनर लावता येणार नाही.

सर्वसाधारण काळातही दक्षता

राजकीय संघटनांच्या बॅनरबाजीमुळे शहर विद्रुप होत असल्याची बाब लक्षात घेता मुंबई महापालिकेच्या नव्या जाहिरात फलक धोरणात कठोर भूमिका घेण्यात आली आहे. बॅनर, फलक किंवा ध्वज आदी अस्थायी स्वरूपाच्या जाहिराती पालिकेच्या सक्षम प्राधिकरणाच्या परवानगीविना लावल्यास पालिका कायदा तसेच राज्याचा मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंधक कायदा यानुसार कारवाई केली जाईल.

अशा जाहिरातींना पालिका, सरकारी मालकीची आवारे, रस्ते यांवर परवानगी दिली जाणार नाही. परंतु महापालिका आयुक्तांनी मुभा दिल्यास सरकार किंवा पालिकेने आयोजित केलेल्या काही समारंभांच्या तसेच तत्सम प्रसंगी त्यासाठी परवानगी मिळू शकते.

रस्त्यातून दिसू शकतील असे बॅनर, फलक, ध्वज खासगी जागेत लावता येतील. त्यासाठी संबंधित जागा मालकाचे, घरमालकाचे किंवा गृहनिर्माण संस्थेचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागेल. त्याशिवाय अशा ठिकाणी मालक राहत नसल्यास मालका बरोबरच या जागेचा ताबा असलेल्या व्यक्तीकडूनही ना-हरकत दाखला घ्यावा लागेल. वार्ड कायालयात परवानगीचा अर्ज करताना प्रकिया शुल्कासोबतच एक महिन्याचे जाहिरात शुल्क द्यावे लागेल.

प्रचार कार्यालयाची जागा

जागा अतिक्रमण करून उभारलेल्या मालमत्तेवर नसावी तसेच धार्मिक ठिकाणीही नसावी. रुग्णालये-शैक्षणिक संस्थांच्या जवळही हे कार्यालय नसावे. सध्या अस्तिवात असलेल्या मतदान केंद्रापासून दोनशे मीटरच्या आत हे कार्यालय थाटता येणार नाही. प्रचार कार्यालयात पक्षाचे चिन्ह, फोटो असलेला एकच बॅनर, झेंडा लावता येईल. बॅनरचा आकार चार बाय आठ फुटाच्या आत असावा.

लोकप्रतिनिधींच्या छायाचित्रांना मनाई

एखाद्या योजना-प्रकल्पाची माहिती देणाऱ्या फलकावर प्रकल्पाच्या तपशीलासह संबंधित खासदार, आमदार, नगरसेवकाचे नाव तसेच क्षेत्र यांचा उल्लेख करता येईल. मात्र या लोकप्रतिनिधींची छायाचित्रे त्यावर लावता येणार नाहीत.

गणपती, नवरात्र मंडळांसाठी...

केवळ यंदाच्या धार्मिक उत्सवांदरम्यान मंडपांमध्ये व्यापारी, राजकीय, सामाजिक जाहिरातींचे बॅनर, फलक, ध्वज लावण्यास परवानगी असेल. त्या-त्या वेळी पालिका त्यासंबंधी परिपत्रक काढणार आहे.

logo
marathi.freepressjournal.in