पश्चिम रेल्वे पोलिसांची 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम सुरु; ४८७ मुलांची यशस्वी सुटक

३१३ मुलांचा, तर १७४ मुलींचा समावेश आहे. रेल्वे पोलिसांनी यापैकी काहींना विविध ठिकाणामधून सोडवून त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली
पश्चिम रेल्वे पोलिसांची 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम सुरु; ४८७ मुलांची यशस्वी सुटक

मुंबई शहराच्या आकर्षणापोटी घरातून पळून येण्याचा तर वेगवेगळ्या कारणांमुळे कुटुंबापासून विभक्त होण्याचा अथवा हरवण्याचे प्रकार सर्रास घडतात. अशा हरवलेल्या मुलांना अथवा पळून येण्याचा घटनांतील पीडित मुला-मुलींना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यासाठी पश्चिम रेल्वे पोलिसांनी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत मागील सात महिन्यांत ४८७ मुला-मुलींची सुटका रेल्वे पोलिसांकडून करण्यात आली आहे.

यामध्ये ३१३ मुलांचा, तर १७४ मुलींचा समावेश आहे. रेल्वे पोलिसांनी यापैकी काहींना विविध ठिकाणामधून सोडवून त्यांच्या पालकांशी पुन्हा भेट घडवून आणली आहे, तर काहींना लहान मुलांसाठी कार्य करणाऱ्या संस्थांकडे सुपूर्द केले असल्याची माहिती रेल्वे पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

देशाच्या कानाकोपऱ्यातून आपले स्वप्न उराशी बाळगून मुंबईकडे येणाऱ्या लोकांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. अनेक मुले-मुली लहान वयातच आपल्या कुटुंबाशी नाळ तोडून मुंबईत दाखल होतात; मात्र यावेळी शिक्षणाचा अभाव, लहान वय आणि भल्यामोठ्या मुंबई शहरात ओळखी पाळखीचे कोणी नसल्याने ही लहान मुले-मुली रेल्वेस्थानकांवर आपले आयुष्य व्यतीत करतात. उदरनिर्वाहासाठी लहान-सहान व्यवसाय अथवा कुठेतरी मजुरी करून आपले पोट भरत दिवस-रात्र स्वप्न पाहताना पाहायला मिळतात; परंतु याच वेळी ही मुले चुकीच्या मार्गावर जाण्याचा घटना सर्वाधिक घडतात.

हीच बाब लक्षात घेऊन रेल्वे पोलिसांनी संपूर्ण देशभरात ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ मोहीम हाती घेतली आहे. यामध्ये घर सोडून पळून आलेली मुले रेल्वेस्थानकांवर आढळल्यास त्यांची चौकशी केली जाते. त्यानंतर स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने त्यांची माहिती गोळा केली जाते. त्यानंतर त्यांना रेल्वे पोलीस आणि सामाजिक संस्था संयुक्त होत घरी पाठवण्याचे प्रयत्न करतात. पश्चिम रेल्वेच्या रेल्वे संरक्षण दलाने जानेवारी २०२२ ते जुलै २०२२ या सात महिन्यांत ४८७ मुलांची सुटका केली आणि त्यांना त्यांच्या कुटुंबीयांशी जोडले आहे. रेल्वे पोलिसांच्या या कार्याबद्दल पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक प्रकाश बुटानी यांनी आरपीएफचे कौतुक केले आहे.

Related Stories

No stories found.
logo
marathi.freepressjournal.in