
शिवसेनेचे बंडखोर आमदार रविवारी विधानसभेच्या सभागृहात कडेकोट बंदोबस्तात दाखल झाले. यावर शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी सडकून टीका केली. मुंबईवर हल्ला करणाऱ्या दहशतवादी कसाबलाही एवढी सुरक्षा पाहिली नाही. बंडखोर आमदारांना आता नेमकी कशाची भीती वाटत आहे, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना खासगी बसमधून विधानभवनात आणण्यात आले. त्यानंतरही त्यांच्यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता. त्यावर अतिरेक्यांनाही एवढी सुरक्षा पाहिली नाही. त्यांना आताही कुठे पळवून नेणार आहात की आमदार कुठे पळून जाण्याची भीती वाटते, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला. विधानभवनात आमदारांसाठी सरकारचीच कडेकोट सुरक्षा असते. असे असूनही बंडखोर आमदारांसाठी वेगळा बंदोबस्त का ठेवला. त्यांना नेमकी कशाची भीती वाटते, असा सवाल आदित्य ठाकरेंनी केला.
आजच्या निवडणुकीसाठी शिवसेनेने जारी केलेला व्हीपच अधिकृत आहे. त्यामुळे आज बंडखोरांनी केलेले मतदान ग्राह्य धरायचे की नाही, याबाबत आम्ही दाद मागू, असे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, विधानसभेचे नवे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे आदित्य ठाकरे यांनी अभिनंदन केले. नार्वेकर आणि आपण एकेकाळी मित्र होतो. त्यामुळे त्यांच्या निवडीबद्दल आनंद झाला, असे ठाकरे म्हणाले.