
उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते, तेव्हा त्यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी का सोपविली नाही? बरं एकनाथ शिंदे यांच्यावर विश्वास नव्हता, तर सुभाष देसाई यांच्याकडे का पदभार सोपविला नाही. याचे कारण, उद्धव ठाकरे यांचा कोणावरही विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी आता कोणालाही विश्वासघातकी वगैरे विशेषणे लावू नयेत,” असे शिंदे गटाचे प्रवक्ते आ. दीपक केसरकर म्हणाले. तसेच, “माझ्या नातवाच्या शाळाप्रवेशाचा विषय जर समोरून काढण्यात येत असेल, तर मलादेखील मी त्यांच्यासाठी केलेल्या महत्त्वाच्या गोष्टी उघड कराव्या लागतील,” असा इशाराही केसरकर यांनी दिला. मंत्रिमंडळ विस्तार लवकरच होईल, असेही ते महणाले.
“उद्धव ठाकरे जेव्हा आजारी होते, तेव्हा त्यांनी खरे तर मुख्यमंत्रिपदाचा पदभार ज्येष्ठ मंत्र्यांकडे सोपवायला हवा होता. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्यावर जेव्हा छोटीशी शस्त्रक्रिया झाली होती, तेव्हा त्यांनी दीड तासासाठी का होईना, उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांच्याकडे राष्ट्राध्यक्षपदाचा पदभार सोपविला होता. एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे क्रमांक दोनचे मंत्री होते. त्यांच्याकडे पदभार दिला पाहिजे होता. शिंदे यांच्यावर विश्वास नव्हता, तर सुभाष देसाईंकडे तरी ती जबाबदारी सोपविली पाहिजे होती; पण उद्धव ठाकरे यांनी तसे केले नाही,” असे केसरकर म्हणाले.