
एकनाथ शिंदेंसोबत शिवसेनेतून बंड करणाऱ्या सातही मंत्र्यांना पदावरून हटवले जाण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री कार्यालयातून राज्यपाल कार्यालयाला यासंदर्भातील पत्र पाठवले जाणार असल्याची माहिती शिवसेना खासदार संजय राऊत यांनी दिली. त्यात या मंत्र्यांना पदावरून हटवले जावे, अशी शिफारस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार आहेत.
एकनाथ शिंदे, गुलाबराव पाटील, दादा भुसे, संदिपान भुमरे, शंभूराज देसाई, बच्चू कडू, अब्दुल सत्तार हे सर्व मंत्री पक्षनेतृत्वाविरुद्ध बंड पुकारत सुरत मार्गे गुवाहाटीमध्ये दाखल झाले आहेत. मागील चार दिवसांपासून ते तेथील हॉटेल रॅडिसन ब्लूमध्ये तळ ठोकून आहेत. त्यांच्यासोबत शिवसेनेचे आणखी ३२ आमदार आणि काही अपक्ष आमदारही आहेत. शिवसेना हे बंड मोडून काढण्यासाठी सर्व प्रकारचे मार्ग अवलंबत आहे. प्रथम चर्चेचे आवाहन करण्यात आले; परंतु त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता कारवाईचा बडगा उगारण्याचा निर्णय घेतला गेला आहे. पक्षातून थेट हकालपट्टी करण्यापेक्षा प्रथम या मंत्र्यांचे पद घालवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.