मुंबई : मनोज जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत. मराठा आरक्षणासाठी लोक रोज आत्महत्या करत आहेत. अशा स्थितीत समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय? सरकार मन की बात करतेय, पण त्यांचे मन निर्दयी आहे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, अशा शब्दांत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाला सुरूवात केली आहे. त्यातच मराठा समाजाचे काही तरूण आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्याही करत आहेत. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात मनोज जरांगे पाटील यांचे अभिनंदन केले होते. भाजप हा समाजात फूट पाडणारा पक्ष असून भाजपपासून सांभाळून रहा, असा सल्लाही दिला होता. तसेच ओबीसी, आदिवासी यांच्या हक्काला धक्का न लागता मराठा, धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न लोकसभेचे विशेष अधिवेशन घेऊन सोडवावा, अशी मागणीही उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केली होती.
आता देखील प्रसिद्धीपत्रकाद्वारे त्यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दल भूमिका मांडली आहे. मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत आहे. सरकार त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण करत असेल तर महाराष्ट्राच्या सामाजिक एकतेला ते चूड लावत आहे. मराठा समाज त्यांचे हक्क मागत आहे व ते त्यांना मिळायला हवेत. ओबीसी, आदिवासी सह इतर समाजाच्या हक्कांना धक्का न लावता मराठा, धनगर समाजाला त्यांचे हक्काचे टिकणारे आरक्षण मिळायला हवे. जरांगे पाटील यांचे प्राण वाचवण्याची त्यांची भूमिका दिसत नाही, असे उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे.