
मुंबई : ‘मीच लोकांच्या मनातील मुख्यमंत्री’, असे वक्तव्य मी केलेच नव्हते. मी याबाबत अनेकदा स्पष्टीकरण दिले आहे. तरीही गृहीत धरू की मी तसे बोलले. मग असे काय आभाळ कोसळले की, त्या माणसाला चक्क आयुष्यातून उठवायचे, असे नसते राजकारणात. तरीही माझ्याबाबतीत तसे केले असेल आणि तसा संदेश लोकांमध्ये गेला असेल, तर ते अजिबात चांगले नाही, अशा शब्दांत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी आपल्या मनातील खदखद बोलून दाखविली.
एका मराठी वेबपोर्टलला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी आपली ही नाराजी बोलून दाखविली. पंकजा मुंडे यांचा २०१९ मध्ये परळी विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर त्यांना राज्यात पक्षीय जबाबदारी न देता थेट भाजपच्या राष्ट्रीय सचिवपदाची जबाबदारी दिली. तसेच मध्य प्रदेशच्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेथील सहप्रभारी म्हणून त्यांच्यावर जबाबदारी सोपविली. मात्र, राज्यात अनेकदा संधी असून, त्यांना कोणतीही जबाबदारी दिली गेली नाही. एवढेच नव्हे, तर त्यांना डावलून इतर नवख्या नेत्यांना विधान परिषदेची संधी दिली. गेल्या ४ वर्षांपासून त्यांना डावलले गेल्याने त्यांनी आतापर्यंत अनेकदा अप्रत्यक्ष नाराजी बोलून दाखविली. त्यातच आता एका मराठी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीदरम्यान २०१४ मध्ये राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार सत्तेवर आलेले असताना मीच लोकांच्या मनातील मुख्यमंत्री असल्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळेच तुमचे पंख छाटले गेले, असे म्हटले जाते, अशी विचारणा करण्यात आली. त्यावेळी पंकजा मुंडे यांनी आपली नाराजी बोलून दाखविली.
मुंडे म्हणाल्या की, ज्या वेदना मलाही नाही कळल्या, त्या तुम्हाला कळल्या आहेत, असे यावरून वाटते. मुळात मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री असे वक्तव्य केलेलेच नव्हते. याबाबत अनेकदा स्पष्टीकरण दिले गेले आहे. तरीही तुम्ही म्हणत असाल आणि त्याचमुळे माझे पंख छाटले जात असतील, तर ते अजिबात चांगले नाही. या वक्तव्यानंतर पुन्हा चर्चेला उधाण आले आहे.